उत्सव गणेशाचा....राबणाऱ्या हातांचा
बेळगाव : श्रावणातील व्रतवैकल्यांची सांगता होते न होते तोच गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. हा उत्सव खऱ्या अर्थाने श्रमिकांचा उत्सव होय. कारण या उत्सवामुळे अनेक हातांना काम मिळते. मूर्तिकार, रंगारी, पुंदन वर्क करणारे कलाकार, मंडप साकारणारे कामगार, सजावटीच्या साहित्याची विक्री करणारे असंख्य हात, पूजा साहित्याची विक्री करणारे तसेच कापसापासून वाती, फुलवाती, गेजवस्त्र तयार करणारे अशा एक ना अनेक लोकांना हा उत्सव काम देतो. त्यांच्या खिशात या उत्सवाच्या निमित्ताने चार पैसे खुळखुळू लागतात. याच कारणास्तव आणि सार्वजनिक स्वरुपात केल्या जाणाऱ्या या उत्सवाचे समाजाला अप्रूप आहे. उत्सव आठ दिवसांवर आला आहे. अर्थातच घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी सुरू आहे. उत्सवाची खऱ्या अर्थाने तयारी केली जाते मूर्तिकारांपासून. एप्रिलपासून सुरू होणारा पाऊस किती दिवस मुक्काम ठोकतो याचा ठोकताळा बांधता येत नाही. पावसामुळे निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे मूर्ती वाळणे कठीणच असते. त्यामुळेच मूर्तिकार जानेवारीपासूनच मूर्ती घडविण्यास सुरुवात करतात.
मूर्ती तयार होतात तोपर्यंत मंडपवाल्यांची व कार्यकर्त्यांची लगबग सुरू होते. रस्त्यांवर मंडप घालण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यासाठी कार्यकर्त्यांची पळापळ संपली आणि गल्लोगल्ली मंडप उभे राहू लागले. मंडपांची मुहूर्तमेढही झाली आणि आता मंडप उभे करण्याच्या कामात गती आली आहे. हे काम तसे कष्टाचे. परंतु वर्षानुवर्षाच्या सवयीमुळे कामगारांना त्याची सवय झाली आहे. कार्यकर्त्यांनी मंडपाचे क्षेत्रफळ व लांबी रुंदी ठरवून दिल्यानंतर ठिकठिकाणी मंडप उभे राहू लागले आहेत. मंडप जितका मोठा तितकी त्याच्या दरात वाढ होते. यंदा मंडप साहित्याच्या दरातही वाढ झाली आहे. गतवर्षी जर एक मंडप उभारणीसाठी एक लाख रुपये अंदाजे खर्च आला तर यंदा त्या दरामध्ये 20 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. याबाबत विचारणा करता सजावटीच्या साहित्यामध्ये विशेषत: मंडपाच्या आतील भागात कापडाच्या साहाय्याने जी सजावट केली जाते ते कापडही महागले आहे. याशिवाय बांबू, लोखंडी खांब यांचे दरही वाढले आहे. कामगारांनीही आपला दाम वाढविला आहे. परिणामी मंडप उभारणीच्या दरातही वाढ झाली आहे, असे मंडप उभारणारे प्रवीण होळकर यांनी सांगितले.
मंडप उभारताना नागरिकांची गैरसोय होणार नाही यावर भर द्या, असे प्रशासनाने सांगितले होते. तथापि, काही गल्ल्यांमध्ये मोठे मंडप उभारल्याने वाहतुकीचा प्रश्न मात्र आतापासूनच सुरू झाला आहे. थोडी गैरसोय होणार याची मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही कल्पना आहे. परंतु बाप्पांसाठी तेवढे चालवून घ्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे. उत्सव जवळ आल्याने मंडपदार एका दिवशीच अनेक ठिकाणी मंडप उभारत आहेत. अर्थातच कामगारांना रात्रपाळीही करावी लागत आहे. मात्र, आधी म्हटल्याप्रमाणे हा उत्सव चार पैसे मिळवून देणारा आहे. त्यामुळे या दहा दिवसात नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागले तरी कामगारांमध्ये उत्साह टिकून आहे.