For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Fertilizer Dealers Protest | कोल्हापुरात शेतकऱ्यांसाठी नवे ॲप ठरतेय डोकेदुखी? खत विक्रेत्यांनी घेतला मोठा निर्णय

01:49 PM Jun 10, 2026 IST | NEETA POTDAR
fertilizer dealers protest   कोल्हापुरात शेतकऱ्यांसाठी नवे ॲप ठरतेय डोकेदुखी  खत विक्रेत्यांनी घेतला मोठा निर्णय
Advertisement

कळंबा : खत विक्रीसाठी शासनाने पाच जून पासून ऑनलाईन खत विक्रीसाठी ॲप आणले आहे . ते ॲप वापरण्यास कृषी सेवा केंद्र चालकांची असमर्थता आहे . सदर ॲप वापरण्यास कृषी सेवा केंद्र चालक तयार नसून सदर ॲप बाबत गुरुवारपर्यंत शासनाने फेर विचार करावा अन्यथा  खत खरेदी बंद करण्याबरोबरच पॉस मशीन परत करण्याचा निर्णय जिल्हा संघटनेच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला .

Advertisement

असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खते व्यापारी संघटना यांच्या वतीने कळंबा येथे जिल्ह्यातील खत विक्रेत्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हाध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष विकास कदम, सचिव सागर खाडे, फर्टिलायझर असोसिएशनचे बागल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्र चालक उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विनोद पाटील म्हणाले, शासनाने सुरू केलेले ऑनलाइन खत खरेदी ॲप प्रत्यक्षात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण करीत आहे. या प्रक्रियेनुसार शेतकऱ्यांनी स्वतः ॲप डाउनलोड करून नोंदणी करणे अपेक्षित आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा किंवा आवश्यक तांत्रिक ज्ञान उपलब्ध नाही. परिणामी ॲप डाउनलोड करून देण्याची जबाबदारी कृषी सेवा केंद्रांवर येत असून त्यामुळे विक्रेत्यांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.

Advertisement

उपाध्यक्ष विकास कदम यांनी सांगितले की, खरीप हंगामाची लगबग सुरू असताना शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्याचे काम महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक शेतकऱ्याला ॲप डाउनलोड करून देणे, त्यांची नोंदणी करणे व बुकिंग प्रक्रिया पूर्ण करणे व्यवहार्य नाही. या प्रणालीमुळे खत वितरण प्रक्रियेत विलंब होत असून शेतकरी आणि विक्रेते दोघांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

संघटनेचे सचिव सागर खाडे यांनी प्रास्ताविकात कृषी व्यवसायासमोरील विविध अडचणींचा आढावा घेतला. त्यांनी ऑनलाइन खत खरेदी ॲपमुळे निर्माण झालेल्या समस्या उपस्थितांसमोर मांडल्या. अनेक विक्रेत्यांनी बैठकीत आपल्या अडचणी मांडताना ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोनची कमतरता आणि वाढती शेतकरी गर्दी यामुळे खत विक्री व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले.

बैठकीत शासनाने तातडीने या निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा १२ जूनपासून जिल्ह्यातील सर्व खत विक्रेते पॉस मशीन परत करून खत खरेदी प्रक्रियाही बंद करतील, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
बैठकीनंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ऑनलाइन खत खरेदी ॲप वापरण्यास कृषी सेवा केंद्र चालक असमर्थ असल्याचे नमूद करत शासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा १२ जूनपासून पॉस मशीन परत करण्याबरोबरच खत खरेदी-विक्री प्रक्रिया बंद करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. बैठकीस सुनील डूणूंग, कुंडलिक पाटील, विजय इंगवले, प्रशांत पाटील, आर. एस. पाटील, श्री. पटेकर, रोहित पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्र चालक उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष कुंभार यांनी केले.

सविस्तर पहा 👇👇

Advertisement
Tags :

.