For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिट्स पिलानीमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

10:25 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिट्स पिलानीमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू
Advertisement

सांकवाळसह परिसरात पुन्हा खळबळ, आतापर्यंत सहा घटना : सखोल चौकशीची मागणी

Advertisement

वास्को : सांकवाळच्या बिट्स पिलानी गोवा कॅम्पस्मध्ये पुन्हा एकदा आत्महत्येचे प्रकरण उघडकीस आले. यावेळी विद्यार्थिनीने आत्महत्या केली. मयत विद्यार्थिनीचे नाव वैष्णवी जीतेश (20) असे असून ती बेंगळूरची आहे. चार महिन्यांच्या खंडानंतर ही घटना घडली आहे. तर मागच्या चौदा महिन्यांतील हा सहावा मृत्यू आहे. वेर्णा पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केलेली आहे. विद्यार्थिनीच्या अशाप्रकारच्या मृत्यूमुळे पुन्हा खळबळ निर्माण झालेली आहे. वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार रविवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांना या घटनेची माहिती मिळाली.

मयत विद्यार्थिनी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्युनिकेशनमध्ये तिसऱ्या वर्षाचे अभियांत्रिकी शिक्षण घेत होती. ती राहत असलेल्या हॉस्टेलच्या खोलीतून ती कोणताच प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आल्याने मध्यरात्रीच्या सुमारास या संस्थेत भीती पसरली. कर्मचाऱ्यांनी व इतरांनी मिळून दरवाजा तोडला व आत प्रवेश केला असता वैष्णवी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. गळफास लावण्यासाठी तिने चादर आणि फॅनचा वापर केला. व्यवस्थापनाने त्वरित ही माहिती वेर्णा पोलिसांना दिली.

Advertisement

बिट्स गोवा कॅम्पस्मध्ये पुन्हा अस्वस्थता

या घटनेमुळे बिट्स पिलानी गोवा कॅम्पस्मध्ये पुन्हा अस्वस्थता पसरली आहे. या नामांकित संस्थेत डिसेंबर 2024 पासून विद्यार्थ्यांनी एकामागोमाग संशयास्पदरीत्या जीवन संपवले आहे. बहुतेकांनी गळफास लावला तर काहींचे मृतदेह त्यांच्या बिछान्यावर संशयास्पदरीत्या आढळून आले. बहुतेक विद्यार्थ्यांच्या मृत्यूमागे मादक पदार्थांचे सेवन हेच कारण असावे असा संशय चार महिन्यांपूर्वी गोव्यात पसरला होता. मागच्या सप्टेंबरमध्ये आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळून आलेल्या विद्यार्थ्याच्या शवचिकित्सा अहवालात त्याच्या आतड्यांमध्ये अमलीपदार्थांचे अंश सापडल्याचे उघडकीस आले होते. विद्यार्थ्यांच्या अशा प्रकारे होणाऱ्या मृत्यूबाबत विरोधी राजकीय पक्षांनी सरकार व बिट्स पिलानी व्यवस्थापनाला लक्ष्य केले होते.

चार महिन्यांच्या खंडानंतर सहावा मृत्यू

सप्टेंबरनंतर मागचे चार महिने बिट्स गोवामधील वातावरण शांत होते. विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूंची मालिका खंडित झाल्याने कॅम्पसमधील भीती दूर झाली होती. मात्र, तरीही मागच्या चौदा महिन्यातील सहाव्या मृत्यूची घटना उघडकीस आली. काहींच्या मते डिसेंबर 2024 च्या पूर्वीही एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. मात्र, पहिलीच घटना असल्याने त्याची चर्चा झाली नव्हती असेही बोलले जात आहे. या हॉस्टेलमध्ये आतापर्यंत तरुणांचेच मृतदेह आढळून आले आहेत. प्रथमच तरुणीच्याबाबतीत ही घटना घडली आहे. संस्थेच्या हॉस्टेलमध्ये यापूर्वी ओम प्रियांश सिंग, अर्थव देसाई, कृष्णा कासेरा, कुशाग्र जैन व रूषी नायर यांचा मृत्यू झाला होता. वैष्णवीचा मृत्यू सहावा आहे. वैष्णवीच्या मृतदेहाची शवचिकित्सा काल सोमवारी करण्यात आली व मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. वेर्णा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आमदार अँथनी वास यांची सरकारकडे चौकशीची मागणी

दरम्यान, कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वास यांनी बिट्स पिलानी गोवा कॅम्पस्ला सोमवारी तातडीने भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या धक्कादायक मृत्यूंबाबत शोक व्यक्त केला आहे. संस्थेचे संचालक प्रा. सुमन कांडू, डीन मिनल कौशीक तसेच इतर अधिकाऱ्यांशी चौकशी करून त्यांनी संचालकांकडे सदर मृत्यूंबाबत तातडीने खुलासा करण्याची मागणी केली. बिट्स पिलानीमध्ये घडणारे विद्यार्थ्यांचे सततचे मृत्यू हा धक्कादायक प्रकार असून असे प्रकार सहन करण्यापलीकडचे आहेत. याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. यापूर्वीही आपण या संस्थेला भेट देऊन आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. आपण यासंबंधी पंतप्रधानांच्या कार्यालयापासून सर्व संबंधितांना बिट्समधील मृत्यूंची दखल घेण्याची मागणी केली होती. आता पुन्हाही  व्यवस्थापनाला लिहिलेले आहे. सरकारने या घटनेची चौकशी करावी तसेच बिट्स शिक्षण संस्थेचीही चौकशी सरकारने करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रसंगी ही संस्थांच दुसरीकडे स्थलांतरीत करावी, असेही आमदार वास यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.