समुद्रात बुडून विद्यार्थिनीचा मृत्यू
गोकर्ण येथील घटना : विद्यार्थ्याला वाचविण्यात यश
कारवार : समुद्र लाटांच्या विळख्यात सापडून एका वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर एका विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आले. ही घटना गोकर्ण येथील मुख्य समुद्र किनाऱ्यावर घडली आहे. कल्याणी (वय 22, रा. केरळ) असे बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे तर वाचविण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव मेहबुब अली (वय 23) असे आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, गेले तीन दिवस सलगपणे सुट्ट्या असल्यामुळे गोकर्णसह परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. कोप्पळ येथील केएमसीचे 12 विद्यार्थी पर्यटनासाठी गोकर्णच्या मुख्य समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले होते.
रविवारी संध्याकाळी 7 वाजता पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी ते समुद्रात उतरले होते. यापैकी कल्याणी ही विद्यार्थिनी आणि मेहबुब अली हा विद्यार्थी लाटांच्या विळख्यात सापडले. कल्याणी समुद्रात बुडाली. तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी व स्थानिकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, यश आले नाही. सोमवारी सकाळी तिचा मृतदेह आढळून आला. बुडणाऱ्या एका विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आले. त्याला तातडीने गोकर्ण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.
तीन पर्यकांना वाचविण्यात यश
आणखी एका घटनेत समुद्रात बुडणाऱ्या 3 पर्यटकांना वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले आहे. ही घटना गोकर्ण येथील मुख्य समुद्र किनाऱ्यावर घडली. मनू (वय 23), शिव (वय 36) आणि किरण (वय 26) अशी त्यांची नावे आहेत.