हैदराबादेत महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या
हुंड्यासाठी छळ झाल्याचा आईचा दावा
वृत्तसंस्था/ हैदराबाद
हैदराबादमध्ये एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. 25 वर्षीय देविका हिने रायदुर्गममधील प्रशांती हिल्स येथील आपल्या घरात छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत देविकाच्या आईने एफआयआर दाखल केला असून त्यामध्ये जावई सतीश लग्नापासूनच देविकाला हुंड्यासाठी त्रास देत होता. सासरच्या छळाला कंटाळून देविकाने आत्महत्या केली असा दावा केला आहे. देविका आणि सतीश एकाच सॉफ्टवेअर कंपनीत काम करायचे. दोघेही एकमेकांना 2 वर्षांपासून ओळखत होते. देविका आणि सतीश हे दोघेही ऑगस्ट 2024 मध्ये गोव्यात विवाहबद्ध झाले होते.
रायदुर्गम पोलिसांनी पती सतीशविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. रायदुर्गम पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत देविकाच्या आईने सतीश याच्या कुटुबियांवर अनेक आरोप केले आहेत. जावई सतीशने आपल्या मुलीच्या नावावर असलेले नोंदणीकृत घर आपल्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी दबाव आणला होता. तसेच हुंड्यासाठी छळ केला, असे म्हटले आहे. तसेच देविकाला शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. सासरच्या लोकांपासून होणारा त्रास सहन न झाल्याने देविकाने आत्महत्या केली, असेही स्पष्ट करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. देविकाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम उस्मानिया रुग्णालयात करण्यात आले.