अंतिम संस्कार करणाऱ्या महिला पुरोहित
सध्या स्त्री-पुरुष समानतेचे युग आहे. जी कामे किंवा क्षेत्रे केवळ पुरुषांसाठी म्हणून मानली गेली आहेत, तीही महिलांकडून पादाक्रांत केली जात आहेत, असे दिसत आहे. याच क्षेत्रांमध्ये ‘पौरोहित्य’ अर्थात पूजाविधी आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे नेतृत्व यांचाही समावेश होतो. येथेही आता महिलांचा वावर वाढला आहे. शुभ कार्यक्रमांचे पौरोहित्य महिलांनी करणे हे आता निदान महाराष्ट्रासारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात नसली तरी काही प्रमाणात दिसून येऊ लागले आहे.
मात्र, पौराहित्याच्या क्षेत्राचाही एक भाग असा आहे की जिथे महिलांचे अस्तित्व आजही नसल्यात जमा आहे. तो भाग म्हणजे मृतदेहावर होणारे अंतिम संस्कार किंवा और्ध्वदैहिक. या क्षेत्रात पुरुषांचाच बोलबाला आहे. त्यांनाच किरवंत अशीही संज्ञा आहे. तथापि, आता येथेही महिलांची पावले उमटू लागली आहेत.
राजस्थानातील उदयपूर शहरातील 64 वर्षीय सरला गुप्ता यांनी हे करुन दाखविले आहे. त्या केवळ विवाह, उपनयन किंवा कान टोचणे अशा शुभ संस्कांरांचेच पौरोहित्य करतान असे नाही. तर त्या अंत्यविधीही करतात. 2016 पासून त्या पौरोहित्य करीत आहेत. तर गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी अंत्यविधी करण्याचे कार्य हाती घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी 70 अंत्यसंस्कार केले आहेत. प्रथम समाजाकडून प्रतिसाद मिळत नव्हता. पण कोरोना काळात त्यांना अंत्यसंस्कारांसाठी बोलाविण्यात येऊ लागले. तेव्हापासून त्यांची प्रसिद्धी आहे.