कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिला पोलिस ठकसेनचा खात्यालाच साडेबारा लाखाचा गंडा

01:00 PM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तब्बल साडेबारा लाख रुपयांचा केला गफला : पोलिस खात्याऐवजी स्वत:कडे वळविले पैसे, डिचोली पोलिसस्थानकातील महिलेचा कारनामा

Advertisement

डिचोली : डिचोली पोलिसस्थानकात कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  डिचोली पोलिसस्थानकातर्फे रस्त्यावर उभे राहून वाहनचालकांकडून वाहतूक नियम भंग केल्याप्रकरणी घेण्यात येणाऱ्या चलनस्वरूपी रक्कमेपैकी लाखोंची रक्कम पोलिस खात्याच्या बँक खात्यामध्ये जमा न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी डिचोली तसेच पोलिस खात्याच्या वरिष्ठ पातळीवरून करण्यात येत आहे.

Advertisement

दरम्यान यात डिचोली पोलिस स्थानकात ड्युटीवर असलेल्या एका महिला पोलिस कॉन्स्टेबलचा हात असून सध्या त्या महिला कॉन्स्टेबलची बदली कोलवाळ कारागृहाच्या एस्कॉर्ट सेलमध्ये करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराची मिळालेल्या माहितीनुसार गेल्या डिसेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024 या दरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे. डिचोली पोलिसस्थानकातील पोलिस रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून चलनाच्या स्वरूपात रक्कम गोळा करीत होते. या दिवसभरातील चलनांची थेट माहिती आल्तिनो पणजी येथे वाहतूक पोलिस मुख्यालयात जात होती. त्यानुसार दिवसाकाठी चलनाच्या रूपात डिचोली पोलिसस्थानकाने किती रक्कम गोळा केली, याची माहितीही मुख्यालयास मिळत होती.

सदर चलनाचे पैसे ड्युटीवरील पोलिसस्थानकातील सदर महिला कॉन्स्टेबलकडे आणून द्यायचे व सदर महिला कॉन्स्टेबलने सदर पैसे खात्याच्या बँक खात्यामध्ये भरायचे, अशीच सदर प्रक्रिया आहे. परंतु सदर महिला कॉन्स्टेबलने आपल्याकडे आलेल्या रक्कमेतील अर्धेच पैसे बँक खात्यात जमा केले. अर्धे अधिक पैसे जमा केलेच नव्हते. ज्यावेळी डिचोली पोलिसस्थानकाने जमा केलेल्या संपूर्ण चलन व त्या स्वरूपातील पैसे याचा हिशेब पोलिस मुख्यालयाने पडताळून पाहिला. त्यावेळी एकूण चलनाचे पैसे सुमारे 25 लाखापर्यंत पोहोचत होते. पोलिस खात्याच्या बँक खात्यामध्ये केवळ साडेबारा लाख ऊपयेच जमा झाल्याचे निदर्शनास आले.

हे प्रकरण उघडकीस येतात खात्यातच खळबळ माजली. या काळात डिचोली पोलिसस्थानकात हे सर्व व्यवहार कोण बघत होते याची चौकशी झाली. तेव्हा सदर महिला कॉन्स्टेबलचे नाव समोर आले. तिच्याकडे याची चौकशी केली असता प्रारंभीच्या काळात तिने कानावर हात ठेवत आपण या प्रकरणात नसल्याचे सांगितले. परंतु नंतर तिनेही कबुली देऊन सदर पैसे आपण जमा करू अशी हमी दिली होती, असे समजते. सदर प्रकरण खात्याअंतर्गत असल्याने खात्याची बदनामी नको यासाठी अंतर्गतपणेच दाबून ठेवण्यात आले होते. त्याची वाच्यता बाहेर कुठेही होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. परंतु सदर प्रकरण बाहेर पडल्याने आता याप्रकरणी खात्याकडूनच चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात अन्य कोणाचा हात आहे का ? याचीही चौकशी सुरू आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article