‘मादी वासराची हमी’ यशस्वी
मादी वासरांच्या संख्येत वाढ, पशुपालकांना पाठबळ
बेळगाव : दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकावरील नर वासराच्या संगोपनाचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘मादी वासराची हमी’ या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात 17,850 गायींना कृत्रिम गर्भधारणा केली आहे. 5640 गाभण गायींपैकी 4479 गायींनी मादी जातीच्या वासरांना जन्म दिला आहे. पशुपालकांच्या गायींना मादी जातीचे वासरुच जन्माला यावे यासाठी ही कृत्रिम गर्भधारणा केली जात आहे. अलीकडे नर जातीचे वासरु जन्माला आल्यास ते पशुपालकांसाठी ओझे ठरू लागले आहे. जन्मताच त्याची विक्री होऊ लागली आहे. यासाठी केंद्र सरकारमार्फत मादी वासराची हमी योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत कृत्रिम रेतन देऊन मादी जातीच्या वासराची पैदास केली जात आहे.
जिल्ह्यात 13 लाख मोठ्या जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गायींची संख्याही अधिक आहे. मात्र गायींना मादी जातीचे वासरु जन्माला येईल याची खात्री नसते. मात्र केंद्र सरकारच्या मादी हमी योजनेंतर्गत गायींना कृत्रिम रेतन भरविल्यानंतर मादी जातीचेच वासरू जन्माला येऊ लागले आहे. त्यामुळे या योजनेकडे पशुपालकांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे गायींची संख्या वाढून दूध उत्पादनात वाढ होत आहे. शेतीत आधुनिक अवजारांचा वापर वाढल्याने बैलांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे गायींनी नर जातीच्या वासराला जन्म दिल्यास ते ओझे वाटू लागले आहे. शिवाय तात्काळ त्याची विक्री केली जात आहे. गायींच्या पोटी मादी जातीच्या वासरांनीच जन्म घ्यावा यासाठी विशेष योजना राबविली गेली आहे. या अंतर्गत गायींना कृत्रिम रेतन करून मादी जातीच्या वासरांची संख्या वाढविली जात आहे. शिवाय पशुपालकांच्या अर्थांजनालाही पाठबळ मिळू लागले आहे.
डॉ. आनंद पाटील (तालुका मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी)
पशुपालकांना मादी जातीच्या वासरांची गरज असते. यासाठी ही योजना राबविली गेली आहे. या अंतर्गत माफक दरात शेतकऱ्यांच्या गायींना कृत्रिम रेतन भरविले जाते. शिवाय मादीच जातीचेच वासरू जन्माला येते.