For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फेडएक्सचे संस्थापक फ्रेडरिक स्मिथ कालवश

06:38 AM Jun 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
फेडएक्सचे संस्थापक फ्रेडरिक स्मिथ कालवश
Advertisement

ओव्हरनाइट डिलिव्हरी’चा संकल्पना साकार करणारा उद्योजक

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

फेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि लॉजिस्टिक्स उद्योगक्षेत्राचे अग्रदूत फ्रेडरिक डब्ल्यू. स्मिथ यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. फेडएक्स कंपनीने रविवारी एका अधिकृत वक्तव्यात यासंबंधी माहिती दिली आहे. स्मिथ यांना जागतिक व्यापाराची दिशा बदलणे आणि ‘ओव्हरनाइट डिलिव्हरी’ यासारख्या क्रांतिकारक संकल्पनांना जन्म देण्यासाठी ओळखले जाते. त्यांनी फेडएक्सला जगातील सर्वात प्रतिष्ठित ब्रँड म्हणून ओळख मिळवून देण्यासह लॉजिस्टिक्स क्षेत्राला नव्या उंचीवर पोहोचविले होते.

Advertisement

फ्रेड केवळ एक उद्योग निर्माते नव्हते, ते फेडएक्सचा आत्मा होते. आमची पीएसपी (पीपल्स-सर्व्हिस-प्रॉफिट) संस्कृती, आमची मूल्ये आणि आमची प्रतिबद्धता या सर्वांचे मूळ फ्रेड यांच्या व्हिजनमध्ये असल्याचे उद्गार फेडएक्सचे वर्तमान अध्यक्ष आणि सीईओ राज सुब्रमण्यम यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून दिलेल्या भावुक संदेशात काढले आहेत.

1965 मध्ये येल विद्यापीठातील शिक्षणादरम्यान फ्रेड स्मिथ यांनी एका टर्म पेपरमध्ये वेळ-संवेदनशील म्हणजेच रात्रभरात कुठल्याही ठिकाणी सामग्री पोहोचविता येईल अशा डिलिव्हरी प्रणालीचा मुद्दा मांडला होता. त्यावेळी या विचाराला अव्यवहारिक आणि अशक्य मानले गेले, परंतु स्मिथ स्वत:च्या विचारावर ठाम राहिले होते.

फ्रेड यांना या पेपरमध्ये केवळ ‘सी’ ग्रेड मिळाला, परंतु हाच विचार नंतर फेडएक्सचा पाया ठरला होता. पदवीनंतर स्मिथ यांनी व्हिएतनाम युद्धात दोनवेळा भाग घेतला होता. युद्धसेवेसाठी त्यांना सिल्व्हर स्टार, ब्राँझ स्टार आणि दोन पर्पल हार्ट्सनी सन्मानित करण्यात आले होते.

1971 मध्ये फ्रेड यांनी फेडएक्सची सुरुवात केली, याकरता त्यांनी कौटुंबिक संपत्ती आणि गुंतवणुकदारांकडून 80 दशलक्ष डॉलर्स जमविले. फेडएक्सने 1973 मध्ये मेम्फिसमध्ये काम सुरू केले आणि पहिल्या दिवशी केवळ 186 पार्सल्स डिलिव्हर केले. परंतु आता ही कंपनी प्रतिदिन जवळपास 1.5 कोटी पार्सल्सची डिलिव्हरी करते आणि याची वार्षिक उलाढाल 80 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे.

स्मिथ हे 2022 पर्यंत कंपनीचे सीईओ राहिले आणि नंतर कार्यकारी अध्यक्षाच्या भूमिकेत होते. फेडएक्समध्ये त्यांची 8 टक्के हिस्सेदारी होती, यामुळे ते अब्जाधीश होते. त्यांचे पुत्र रिचर्ड स्मिथ सध्या फेडएक्स एअरलाइन्सचे सीईओ आहेत. फ्रेड स्मिथ यांची नेतृत्वक्षमता आणि दूरदृष्टीने कंपनीला स्थिरता मिळवून दिली होती. त्यांनी एअर कार्गो डिलिव्हरीला सोपे करण्यासह विश्वसनीय स्वरुप मिळविले होते. यामुळे अनेक उद्योगांना वेगाने सामग्री पाठविण्याचा नवा मार्ग मिळाला होता.

फेडएक्सने काळासोबत तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि आंतरराष्ट्रीय विस्तारात अग्रणी भूमिका बजावली आहे. आता ही कंपनी जागतिक व्यापारासाठी एक मजबूत आधार ठरली आहे. हे केवळ फ्रेड स्मिथ यांचे स्वप्न आणि नेतृत्वामुळेच शक्य ठरले आहे.

Advertisement
Tags :

.