फेड्रीको सीना महाराष्ट्र चॅलेंजर स्पर्धेत विजेता
वृत्तसंस्था, पुणे
येथे झालेल्या एटीपी टूरवरील महाराष्ट्र खुल्या चॅलेंजर 75 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या फेड्रीको सीनाने एकेरीचे जेतेपद पटकाविताना ब्रिटनच्या फेलिक्स गीलचा पराभव केला.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात सहाव्या मानांकीत फेड्रीको सीनाने फेलिक्स गीलचा 6-3, 5-7, 7-6 (7-1) अशा सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले.हा अंतिम सामना अडीच तास चालला होता. या सामन्यामध्ये इटलीच्या सीनाने पहिला सेट केवळ 29 मिनिटांत 6-3 असा जिंकला. त्यानंतर गीलने पिछाडीवरुन मुसंडी मारत दुसरा सेट 7-5 असा जिंकून सीनाशी बरोबरी केली. अपेक्षेप्रमाणे तिसरा सेट टायब्रेकरपर्यंत लांबला. 18 वर्षीय सीनाने बेसलाईन खेळावर अधिक भर देत हा शेवटचा आणि तिसरा सेट जिंकून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. सीनाला या जेतेपदाबरोबरच 17 हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळाले तसेच त्याला 75 एटीपी गुणही मिळाले. उपविजेत्या गीलला 9600 डॉलर्सचे बक्षीस आणि 40 एटीपी गुण मिळाले.