४ कार्यकर्त्यांचा मनसेला रामराम !
गटातटाच्या राजकारणाला कंटाळून दिला राजीनामा
कुडाळ -
मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, माजी मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव,विद्यार्थी सेना माजी जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व रस्ते आस्थापना सेलचे जिल्हा संघटक अमोल जंगले यांनी मनसे पक्षाला जय महाराष्ट्र केला.त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात तसे नमूद केले आहे. या प्रमुख सक्रिय कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्याने जिल्ह्यात मनसेला खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चारही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पत्रात असे म्हटले आहे की,आपल्या विचारांनी प्रभावित होऊन पक्ष संघटनेत सहभागी झालो. पदाधिकारी म्हणून काम करीत असताना पक्षाची ध्येय धोरणे, आंदोलने व मराठी अस्मिता जपण्यासाठीचे पक्षाने घेतलेले विविध उपक्रम अगदी प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक राबवून ते तन-मन-धन खर्च करून तळागाळापर्यंत पोहचविले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सक्षम विरोधी पक्ष म्हणून कायम जनतेची भूमिका मांडत सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम अग्रक्रमाने केले. विविध विषयांवर आक्रमकपणे आंदोलने करून पिडीत जनतेला न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले.मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील वर्षभराच्या कालावधीपासून पक्ष निरीक्षकांकडून द्वेष भावनेतून जे पक्षांतर्गत गटातटाचे गलिच्छ राजकारण चालू केले आहे व त्यातून झालेली पक्ष संघटनेची हानी पाहता पडत्या काळात कट्टर महाराष्ट्र सैनिकांनी दाखविलेली निष्ठा "बडव्यांनी" पार धुळीस मिळवून टाकली आहे,अशी टीका केली आहे. पक्ष संघटनेत पदाधिकाऱ्यांकडून चालू असलेली मुजोरी ही भविष्यात संघटनेस हानिकारक ठरणार आहे. सन २००५ साली विठ्ठला भोवती जमलेल्या “ज्या” बडव्यांमुळे आपल्यावर बाळासाहेबांची साथ सोडून शिवसेना सोडायची वेळ आली. त्याच प्रमाणे सिंधुदुर्गातील बहुतांशी महाराष्ट्र सैनिकांवर हीच वेळ आली आहे. आपण मनसे पक्षात जी संधी दिली व त्यामुळे जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय पटलावर नावारूपास आलो.त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करत आहोत.पक्षातील मुजोरी कार्यपद्धतीला कंटाळून आम्ही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे नमूद करीत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.