‘टॅरिफ’ची धास्ती: सेन्सेक्स 849 अंकांनी कोसळला
निफ्टीही प्रभावीत : गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील मंदावलेल्या संकेतांमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरणीसह बंद झाले. अमेरिकेने भारतातील आयातीवर टॅरिफ लादण्याची अधिकृत अधिसूचना जारी केल्यामुळे बाजारात विक्रीचा जोर वाढला. टॅरिफच्या परिणामांबद्दल वाढती चिंतेमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 200 अंकांपेक्षा जास्त घसरून 81,377.39 वर उघडला. अखेरच्या क्षणी 849.37 अंकांनी घसरुन निर्देशांक 80,786.54 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 24,899 वर खाली उघडला. अखेर 255.70 अंकांनी घसरून 24,712.05 वर बंद झाला.
अमेरिकेने भारतातील आयातीवर एकूण 50 टक्के कर लादण्याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. हा नवीन कर 27 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12:01 वाजता लागू होईल. अमेरिकेच्या प्रशासनाचा दावा आहे की भारत रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेन युद्धात मॉस्कोला अप्रत्यक्षपणे आर्थिक मदत करत आहे.
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, सनफार्माचे शेअर्स सर्वाधिक घसरले. तो 3.15 टक्क्यांनी घसरून बंद झाला. टाटा स्टील, ट्रेंट लिमिटेड, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स, टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स, टायटन, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचे शेअर्स प्रमुख घसरणीत होते. बाजारात घसरण झाली असली तरी, हिंदुस्थान युनिचे शेअर्स 2.35 टक्क्यांनी वाढून बंद झाले. मारुती, आयटीसी, टीसीएस, अल्ट्रा सिमेंटचे शेअर्स घसरणीत होते. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 1.62 टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 2.03 टक्के घसरला. क्षेत्रीय आघाडीवर, निफ्टी रिअॅल्टी निर्देशांक 2.24 टक्क्यांनी तोट्यात होता. निफ्टी फार्मा निर्देशांक 1.67 टक्के, निफ्टी मेटल निर्देशांक 1.66 टक्के घसरला.