विरोधकांना घाबरून केले अधिवेशन कमी दिवसांचे
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांची टीका
पणजी : सहा दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुरेसे नाही. त्यानंतर सहा महिने तरी अधिवेशन होणार नाही. सरकार पक्ष विरोधकांना घाबरत असल्यामुळेच अधिवेशनाचे दिवस कमी ठेवले आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी केली आहे. सभापती रमेश तवडकर यांनी आळीपाळीने एक-एक प्रश्न विरोधक, सत्ताधारी यांना विचारण्याची संधी न दिल्यास बहिष्कार घालण्याचा इशारा आलेमांव यांनी दिला आहे. राज्यातील विविध प्रश्नांवऊन सरकारला जाब विचाऊन कोंडीत पकडणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सत्ताधारी पक्ष विरोधी आमदारांच्या विधानसभेतील हक्कांवर गदा आणत असल्याचा आरोप आलेमांव यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते आलेमांव यांच्या विधानसभेतील दालनात विरोधी आमदारांची बैठक झाली. त्यानंतर आलेमांव पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, सहा दिवसीय अधिवेशनात गोव्यातील सर्व प्रश्न मांडणे कठीण असले तरी सरकारला घेरल्याशिवाय सोडणार नाही असे विरोधी आमदारांनी सूचित केले. विविध विषयांवरील प्रश्न विधानसभा अधिवेशनात विचारले जाणार असून सरकारला उघडे पाडणार असल्याचे विरोधी आमदारांनी सांगितले. काँग्रेससह आपचे व इतर विरोधी आमदार बैठकीस हजर होते.