रशियात प्लेग फैलावण्याची धास्ती
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियातील सायबेरियामधील एका प्लेग-विरोधी संशोधन संस्थेतील 28 वर्षीय संशोधकाचा प्लेगसदृश आजारामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे. संशोधकाच्या मृत्यूनंतर सुमारे 200 लोकांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. काही भागांमध्ये विलगीकरणासारखे (क्वारंटाइन) प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्यात आले आहेत. तथापि, हा आजार प्लेग होता की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न अनुत्तरित आहे. रशियन आरोग्य अधिकाऱ्यांनी अद्याप याची अधिकृत पुष्टी केलेली नसली तरी पूर्णपणे वैद्यकीय सतर्कता जारी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इर्कुत्स्क प्लेग-विरोधी संस्थेत काम करणाऱ्या दार्या शिपिलोव्हा यांना 29 सप्टेंबर रोजी तीव्र न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, परंतु दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्या शेजारच्या बुरियातियामध्ये एका क्षेत्रीय मोहिमेवर असताना त्यांची प्रकृती खालावण्यापूर्वी जिवंत जिवाणू असलेली एक टेस्ट ट्यूब त्यांच्या हातून चुकून फुटल्याचे सहकर्मचाऱ्यांना सांगितले होते.
दार्या शिपिलोव्हा या महिला संशोधकाच्या मृत्यूनंतर तिच्या संपर्कात आलेल्या सुमारे 200 लोकांना वैद्यकीय देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. ही महिला सायबेरियातील एका प्लेग-विरोधी संशोधन संस्थेत काम करत होती. 25 सप्टेंबर रोजी प्रयोगशाळेत काम करत असताना तिच्या हातून जिवंत जैविक नमुने असलेली एक टेस्ट ट्यूब फुटली होती. 29 सप्टेंबर रोजी तिची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतरही तिची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. 1 ऑक्टोबरच्या रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
टेस्ट ट्यूबमध्ये काय होते हे अद्याप अस्पष्ट
टेस्ट ट्यूबमधील जैविक नमुन्याच्या प्रकाराबद्दल अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. काही स्थानिक वृत्तांनी याचा संबंध प्लेग-संबंधित नमुन्याशी जोडला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर, तिला कोणता संसर्ग झाला होता याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तिला तीव्र न्यूमोनिया झाला होता, परंतु आजाराचे कारण अद्याप अज्ञात आहे. या घटनेनंतर परिसरात विविध अफवा पसरत आहेत. याबाबत बोलताना हा आजार प्लेग असण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे रशियाचे माजी आरोग्य अधिकारी गेनाडी ओनिशचेन्को म्हणाले. जरी प्लेगची पुष्टी झाली तरी, तो मोठ्या प्रमाणावर पसरण्याचा कोणताही धोका नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
