मोर्चाची धास्ती; शहरभर पोलीस बंदोबस्त
धर्मवीर संभाजी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात
बेळगाव : मराठी भाषेच्या अस्मितेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चाची हाक देताच प्रशासनाने धास्ती घेतली. सोमवारी निवेदन देण्याचे निश्चित करूनदेखील प्रशासनाकडून धास्ती घेण्यात आल्याचे चित्र दिसून आले. धर्मवीर संभाजी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच वातावरण बिघडू नये, यासाठी पोलिसांची नजर होती. संविधानाने दिलेल्या हक्काप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चाची आखणी केली होती. परवानगीसाठी पोलिसांकडे रितसर अर्ज करण्यात आला होता. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलीस प्रशासनाने महामोर्चाला परवानगी नाकारली. मराठी भाषिकांमधील वाढती एकी पाहून प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा बाऊ
करत परवानगी नाकारली. परंतु, त्यानंतरही म. ए. समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला. धर्मवीर संभाजी चौक येथे सोमवारी सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त होता. पोलिसांच्या वाहनांसह ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर धर्मवीर संभाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकाळपासून पोलीस दिसून येत होते. प्रत्येक हालचालींवर पोलिसांची नजर होती. जिल्हाधिकारी कार्यालयातही एरव्ही वाहनांची गर्दी असते. परंतु, सोमवारी म. ए. समितीच्या मोर्चामुळे जिल्हाधिकारी वगळता इतर कोणत्याच अधिकाऱ्याचे वाहन आतमध्ये सोडण्यात आले नाही. त्यामुळे कार्यालयाच्या समोरच्या भागात शुकशुकाट होता. म. ए. समितीच्या मोर्चाची धास्ती घेऊन प्रशासनाने या उपाययोजना केल्याची चर्चा होती.