For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संशयित निकृष्ट मिठाईवर एफडीएची कारवाई; टाकवडे येथील दूध प्रकल्पातून २०८ किलो हलवा, रबडी जप्त

02:21 PM Sep 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
संशयित निकृष्ट मिठाईवर एफडीएची कारवाई  टाकवडे येथील दूध प्रकल्पातून २०८ किलो हलवा  रबडी जप्त
Advertisement

कोल्हापूर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तपासणी मोहीम तीव्र केली आहे. शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथील एका मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्टवर केलेल्या तपासणीत संशयित निकृष्ट दर्जाचा हलवा आणि रबडी आढळून आली. एफडीएच्या पथकाने दोन्ही अन्नपदार्थांचा साठा ताब्यात घेतला असून, नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Advertisement

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ११ सप्टेंबर रोजी टाकवडे, ता. शिरोळ येथील संबंधित आस्थापनाची तपासणी केली. यावेळी तयार अन्नपदार्थामध्ये १० किलो हलवा, ज्याची किंमत सुमारे ६ हजार रुपये, तर १९८ किलो रबडी, किंमत सुमारे ४५ हजार ५४० रुपये, असा एकूण २०८ किलो साठा आढळून आला. या अन्नपदार्थांचा दर्जा निकृष्ट असल्याचा संशय आल्याने एफडीएने नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित आस्थापनाविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, पनीर, तूप, दूध आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमध्ये भेसळ अथवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकले जाऊ नयेत, यासाठी जिल्ह्यातील उत्पादक, विक्रेते आणि खाद्य आस्थापनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना त्याची गुणवत्ता, लेबल, उत्पादन व वापरण्याची अंतिम तारीख तसेच पक्के बिल तपासावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

Advertisement

Advertisement

.