फाझल 500 गुणांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू
वृत्तसंस्था/ हैदराबाद
बंगाल वॉरियर्सचा फाझल अत्राचली हा प्रो कब•ाr लीगच्या इतिहासात 500 टॅकल पॉइंट्सचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू ठरला आहे. ‘दि सुलतान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाझलने मंगळवारी हैदराबादमधील गचीबोवली येथील जीएमसीबी इनडोअर स्टेडियमवर गतविजेत्या पुणेरी पलटणविऊद्धच्या सामन्यात हा टप्पा गाठला.
फाझल हा बंगाल वॉरियर्स संघाचा कर्णधार असून या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांत त्याने एकूण 15 गुण मिळवले आहेत. एकंदरित तो प्रो कब•ाr लीगमध्ये 173 लढती खेळलेला असून त्याने 509 गुण मिळवले आहेत. सदर दिग्गज इराणी कब•ाrपटूला ‘पीकेएल’च्या 11 व्या मोसमासाठीच्या खेळाडू लिलावात बंगाल वॉरियर्सने करारबद्ध केले. ‘पीकेएल’च्या इतिहासातील तो सर्वांत यशस्वी कर्णधार आहे आणि त्याने या मोसमात बंगाल वॉरियर्सचे नेतृत्व आपल्या शैलीत केले आहे.
32 वर्षीय फाझल हा पीकेएलमधील सर्वांत अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याने दोनदा सदर प्रतिष्ठित लीगचे विजेतेपद पटकावले आहे. या गतिमान बचावपटूला त्याच्या पदार्पणाच्या वर्षात म्हणजे दुसऱ्या मोसमात आणि नंतर पुन्हा एकदा चौथ्या मोसमात जेतेपद मिळविण्यात यश प्राप्त झाले होते. पाचव्या मोसमात त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. बंगाल वॉरियर्ससमवेत फाझलचे लक्ष्य तिसरे विजेतेपद मिळविण्याचे आहे, तर संघ सातव्या मोसमानंतरचे त्यांचे दुसरे जेतेपद जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवून आहे.
विशेष म्हणजे सातवा मोसम हे फाझलचे सर्वांत फलदायी वर्ष होते, जेव्हा त्याने 84 गुण नोंदवले होते आणि सहाव्या मोसमात 1 कोटी रुपयांचा टप्पा लिलावात पार करणारा तो पहिला खेळाडू बनला होता. नवव्या मोसमात तो ‘पीकेएल’च्या इतिहासातील सर्वांत महागडा बचावपटू बनून त्याला खेळाडूंच्या लिलावात 1.38 कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आले होते. त्याने चौथ्या आणि सातव्या मोसमांत लीगचा सर्वोत्कृष्ट डिफेंडरचा पुरस्कार देखील जिंकला.