बाशुदेव पाण्यात नाहीच वडिलांचा दावा, वेगळ्या दिशेने शोधाची गरज
पणजी : सांत इस्तेव येथे फेरीबोट धक्क्यावरून कार नदीत गेल्याच्या घटनेनंतर आता जवळपास 1 महिन्याच्या कालावधीनंतर, ओल्ड गोवा पोलिसांनी काल सोमवारी भारतीय नौदलाच्या पाणबुड्यांसह बेपत्ता बाशुदेव भंडारीचा पुन्हा शोध घेतला, मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. बाशुदेव पाण्यात नाहीच असा दावा बाशुदेव याचे वडील नारायण भंडारी यांनी केला आहे. काल सोमवारी ही शोध मोहीम राबविली तेव्हा बाशुदेव याच्या भावासह त्याचे वडीलही उपस्थित होते.
बाशुदेव पाण्यात बुडालेला नसून तो बेपत्ता झाला किंवा केला असावा असे आम्ही पोलिसांना या अगोदरच सांगितले आहे. त्याबाबत कोणत्या दिशेने शोध घ्यावा हेही पोलिसांना सांगण्यात आले आहे. मात्र बाशुदेव बुडाला असण्याची शक्यता व्यक्त करीत पोलीस त्याचा पाण्यात शोध घेत आहेत. पोलिसांना त्यांचे काम करण्यास आम्ही अडथळा आणत नाही, मात्र बाशुदेव याला चांगले पोहता येत होते. त्यामुळे तो बुडण्याची शक्यता नाही. त्याचा वेगळ्या दिशेने शोध घेणे गरजेचे आहे. आता पोलीस काय करतात याकडे आमचे लक्ष लागून राहिले आहे असेही नारायण भंडारी म्हणाले.
काल सोमवारी संध्याकाळी 5 पर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. पाणबुडे तसेच ड्रोनच्या सहाय्याने खोलवर शोध घेण्यात आला. हे काम पोलिसांनी एका खाजगी कंपनीला दिले होते, मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. सांखळीहून पणजीच्या दिशेने जाताना 31 ऑगस्टच्या मध्यरात्री सांत इस्तेव येथे पोचल्यानंतर फेरीबोट धक्यावरून बाशुदेव आणि त्याच्या मैत्रीणीसह कार पाण्यात पडली होती. या घटनेतून बाशुदेवची मैत्रीण वाचली तिने दिलेल्या माहितीनुसार बाशुदेव पाण्यात बुडाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा नदीपात्रात शोध घेत आहेत.