मुलासमोरच वडिलांचा गोळी घालून खून; आर्थिक वादातून प्रकार
दोनवडे येथील घटना, संशयीत पोलीस ठाण्यात हजर : दोनवडे, खुपीरे तणावपूर्ण वातावरण
वाकरे प्रतिनिधी
आर्थिक वादातून हॉटेल व बार मालकाचा समोरुन छातीवर गोळी घालून निर्घुण खून करण्यात आला. दोनवडे (ता. करवीर) येथे शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये चंद्रकांत आबाजी पाटील (वय 50 रा. दोनवडे ता. करवीर) हे जागीच मृत झाले असून त्यांचा मुलगा रितेश जखमी झाला आहे. या घटनेनंतर दोनवडे, खुपीरे परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. संशयीत आरोपी दत्तात्रय कृष्णात पाटील (वय 40 रा. खुपिरे), सचिन गजानन जाधव (वय 38) हे करवीर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत पाटील यांचे दोनवडे फाटा येथे गोल्डन हॉटेल, बार व लॉजींग आहे. गेल्या दोन वर्षापासून हॉटेल व्यवसाय बंद आहे. केवळ लॉजींगच सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांनी दोन वर्षापूर्वी दत्तात्रय पाटील व सचिन जाधव यांच्याकडे काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी दिली होती. यामध्ये या दोघांना नुकसान झाले होते. तेंव्हापासूनच चंद्रकांत पाटील व दत्तात्रय पाटील यांच्यामध्ये वाद धुमसत होता. यातून या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
शनिवारी सकाळी रितेश पाटील हे हॉटेलमध्ये आले होते. लॉजींग सुरु असल्याने ते दिवसभर हॉटेलमध्येच थांबून होते. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत पाटील दुचाकीवरुन हॉटेलमध्ये आले. यावेळी काही वेळातच संशयित दत्तात्रय पाटील व सचिन जाधव हे दुचाकीवरुन चंद्रकांत पाटील यांच्या हॉटेलमध्ये आले. यावेळी चंद्रकांत पाटील व दत्तात्रय पाटील यांच्यामध्ये वाद सुरु झाला. दत्तात्रय पाटील व सचिन जाधव हे दोघेही चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर धावून गेले. या दोघांनी चंद्रकांत पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये रितेश याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, व वडिलांना यातून सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी दत्तात्रय पाटील याने स्वत:जवळील पिस्तुल काढून चंद्रकांत पाटील यांच्यावर रोखली. अगदी जवळून त्याने गोळी थेट चंद्रकांत पाटील यांच्या छातीत मारली. यामुळे अवघ्या क्षणातच चंद्रकांत पाटील खाली कोसळले. त्यांच्या छातीत गोळी लागल्याने ते निपचीत पडले. गोळीबाराच्या घटनेनंतर काही वेळातच सचिन व दत्तात्रय या दोघांनी दुचाकीवरुन पळ काढला. यानंतर जखमी अवस्थेत रितेश याने या घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून चंद्रकांत पाटील यांना रुग्णवाहिकेतून सिपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच पाटील यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात गर्दी केली होती. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान घटनास्थळी अपर पोलीस उपअधिक्षक निकेश खाटमोडे, पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी भेट दिली.
सिसीटीव्ही बंद
चंद्रकांत पाटील यांचे दोनवडे फाट्यावर गोल्डन हॉटेल, बार व लॉजीग आहे. कोरोना काळानंतर हॉटेल व बार बंद आहे. केवळ लॉजींग सुरु आहे. यामुळे हॉटेलमधील सिसीटीव्ही बंद होते. शनिवारी गोळीबाराच्या घटनेवेळीही सिसीटीव्ही बंद होते. यामुळे या घटनेचे चित्रीकरण मिळू शकले नाही. मात्र परिसरातील सिसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम सुरु होते.
रक्ताचे थारोळे
गोळीबाराच्या घटनेनंतर मोठा आवाज झाला. अगदी जवळून छातीवर गोळी झाडल्याने चंद्रकांत पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रकांत यांच्या छातीत गोळी लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. अवघ्या काही सेकंदातच घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. चंद्रकांत पाटील यांचे कपडे रक्तात माखले होते.
पुर्वनियोजीत कट
चंद्रकांत पाटील शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये आले. यानंतर अवघ्या काही मिनीटातच दत्तात्रय व सचिन हे हॉटेलमध्ये दाखल झाले. हे दोघेही चंद्रकांत पाटील यांच्या पाळतीवर होते. चंद्रकांत पाटील हॉटेलमध्ये दाखल होताच दोघे हल्लेखोरही दुचाकीवरुन हॉटेलमध्ये दाखल झाले.
संशयित स्वत:हून हजर
हल्ल्यानंतर संशयित दत्तात्रय कृष्णात पाटील, सचिन गजानन जाधव हे दाघेही करवीर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात दाखल होवून आम्हीच गोळीबार केल्याचे सांगितले. तसेच गोळीबारातील बंदुकही पोलिसांकडे दिली. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली.
अडकलेल्या जागेच्या व्यवहारातून खून
चंद्रकांत पाटील हे जागेचा व्यवहार करत होते. अडचणीत असणाऱ्या किंवा अडकलेल्या जागा सोडविण्यात त्यांचा हातखंडा होता. सचिन जाधव, दत्तात्रय पाटील या दोघांनी एक जागा खरेदी केली होती. यावरील आरक्षण हटविण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली होती. यासाठी काही रक्कमही या दोघांनी चंद्रकांत पाटील यांना दिली होती. ही परत मागण्यासाठीच दत्तात्रय पाटील, सचिन जाधव हे हॉटेलवर गेले होते. यातूनच हा खून झाल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला असून, या शक्यतेची पडताळणीही सुरु आहे.
गावठी कट्टा, पुंगळी दुचाकी, कपडे जप्त
संशयित दत्तात्रय पाटील, सचिन जाधव यांनी गावठी कट्यातून गोळीबार केला आहे. 0.9 एम.एमच्या गावठी कट्यातून गोळीबार केला. संशयितांनी एक गोळी चंद्रकांत पाटील यांच्यावर झाडली तर दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी पळ काढला. यामुळे घटनास्थळी पडलेली पुंगळी पोलिसांनी जप्त केली आहे. तर चंद्रकांत पाटील यांचे रक्ताने माखलेले कपडेही सिपीआर रुग्णालयातून तर हल्लेखोरांचेही कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत.
दोनवडे, खुपिऱ्यात बंदोबस्त
दोनवडे येथे गोळीबार झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली. यानंतर घटनास्थळी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दोनही गावे नजीक असल्याने दोनही गावांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे पथक परिस्थीती नियंत्रणासाठी थांबून होते. संशयीत हल्लेखोरांच्या घराबाहेरही बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे या दोनही गांवांना पोलीस छावणींचे स्वरुप आले होते.