For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पिता-पुत्राच्या मृत्यूने डिचोलीत खळबळ

01:15 PM Mar 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
पिता पुत्राच्या मृत्यूने डिचोलीत खळबळ
Advertisement

एकाच खोलीत आढळले दोघांचेही मृतदेह : वडिलांची आत्महत्या, मुलाच्या मृत्यूचे गूढ,घरात  सापडली वडिलांची 12 पानी चिठ्ठी

Advertisement

डिचोली : नाईकनगर बोर्डे, डिचोली येथे एका घरात वडील व पुत्राचा मृतदेह आढळून आल्याने डिचोलीत खळबळ माजली आहे. प्रथमदर्शनी या प्रकरणात वडिलांनी आत्महत्या केल्याचे सिद्ध होत असून मुलाच्या मृत्यूबाबत मात्र गूढ व्यक्त करण्यात येत आहे. एकाच खोलीत दोन्हीही मृतदेह आढळून आले असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. मयत वडील संजय म्हापसेकर हे डिचोली भाजप मंडळ समितीचे सरचिटणीस तसेच सक्रिय कार्यकर्ते म्हणून सर्वत्र परिचित होते.

मुलीला दिसले दोन मृतदेह

Advertisement

उपलब्ध माहितीनुसार मयत संजय म्हापसेकर व पुत्र या दोघांचेही मृतदेह खोलीत आढळून आले. पुत्र 14 वर्षीय असून तो नववीत शिकत होता. मुलाचा मृतदेह खोलीतील खाटीवर होता, तर वडिलांचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. काल सोमवारी 16 मार्च रोजी संध्याकाळी त्यांची मुलगी कामावरून घरी परतल्यानंतर तिने घराचा दरवाजा उघडला आणि खोलीमध्ये जाऊन पाहताच तिला हादराच बसला. दोघेही निपचित पडल्याचे पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीने सर्वप्रथम आपल्या मामांना फोन लावून घटनेची माहिती दिली. माहिती मिळतात मामांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिकांच्या सहाय्याने त्यांनी घरात जाऊन पाहिले असता दोघांचेही मृतदेह आढळून आले. घटनेची वार्ता नंतर डिचोली पोलिसांना देण्यात आली. 108 रुग्णवाहिकालाही माहिती देण्यात आल्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.

घटनास्थळी रुग्णवाहिकेतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मृतदेह तपासल्यावर दोघेही मृत झाल्याचे सांगितले. लागलीच पोलिसही घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तपासकाम हाती घेतले. घटनेची माहिती मिळतात डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर डिचोली भाजप मंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी, नेते तसेच माजी आमदार नरेश सावळ यांनीही घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली. घरच्यांकडे विचारपूस केली. डिचोलीचे पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व पोलिसपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा हाती घेत लगेच फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. रात्री 9.30 वा. च्या फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेची पूर्ण चौकशी करून आवश्यक पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला.

घटनास्थळी सापडली 12 पानी चिठ्ठी

उपलब्ध माहितीनुसार घटनास्थळी वडील संजय म्हापसेकर यांनी लिहिलेली बारा पानी चिठ्ठी आढळून आली आहे. त्यांनी घडलेल्या घटनेबाबत माहिती तसेच इतर काही सूचना व माहिती दिली आहे, असे समजते. चिठ्ठीतील संपूर्ण मजकूर समजू शकलेला नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय म्हापसेकर हे जमिनीवर पडलेले होते, तर मुलगा हा कॉटवर होता. त्याच्या तोंडाला मार लागला होता व रक्तस्त्रावही होत होता.

संजय म्हापसेकर यांच्या तोंडातून फेस आला होता. त्यामुळे संजय म्हापसेकर यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, तर मुलाच्या मृत्यूबाबत गुढ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबाबत आमदार डॉ चंद्रकांत शेट्यो यांनी दु:ख व्यक्त केले आहे. संजय हे एक सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या अशा प्रकारे अकाली व अनपेक्षित मृत्यूमुळे अत्यंत दु:ख होत आहे. याप्रकरणी पोलीस सखोल चौकशी व तपास करीत असून या मागचे कारण लवकरच समोर येईल, असे सांगितले.

उत्तरीय तपासणीनंतर होणार प्रकरणाचा उलगडा

प्रकरणाचा तपास लावण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पंचनामा व फॉरेन्सिक पथकाने आवश्यक गोष्टी मिळवल्यानंतर रात्री उशिरा दोन्हीही मृतदेह बांबोळी येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व पोलीस पथक पुढील तपास करीत आहे. उत्तरीय तपासणीअंती मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दोन्हीही मृतदेहांची आज मंगळवारी शवचिकित्सा केली जाणार आहे. त्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल.

Advertisement
Tags :

.