तरूणाच्या आकस्मिक मृत्यूने वडिल झाले एकाकी
सांगली :
दहा वर्षापूर्वी आईचं छत्र हरपलं... बहिणीचा विवाह झाल्याने ती परराज्यात स्थायिक... बाप-लेक दोघेच घरात रहायचे... खानावळीतून डबा खायचे.... आज तोच तरूण कामानिमित्त घरातून बाहेर पडला तो पुन्हा आलाच नाही. विश्रामबागमधील एका गेम पार्लरमध्ये तो चक्कर येवून कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर सुन्न झालेले वडिल एकटेच रुग्णालयात पाणावलेल्या डोळ्यांनी बसले होते. मित्र परिवार होता. पण हक्काच एकमेव आधार संपल्याने वडिलांना अंधारी आली. ही सुन्न करणारी घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
सचिन मारूती जाधव (३४, रा. कॉटनमील जवळ, माधवनगर) असे त्याचे नाव आहे. रुग्णालय व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मृत सचिन जाधव हा एका फायनान्स कंपनी कार्यरत होता. त्याचे वडिल निवृत्त आहेत. आईचा दीर्घ आजाराने दहा वर्षापुर्वीच मृत्यू झाला होता. मोठ्या एकमेव बहिणीचे लग्र झाले आणि ती तमिळनाडू येथे सासरी गेली. सचिन व त्याचे वडिल मारूती दोघेच घरात रहायचे. वडिलांना सचिनचाच आधार होता. सकाळ-सार्यकाळ ते खानावळीतील जेवण करायचे. सचिन आज नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडला. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विश्रामबाग परिसरातील गेम पार्लर येथे तो बसला होता. त्याच्यासोबत काही मित्र देखील होते. गप्पाटप्पा सुरू होत्या. तेवढ्यात त्याला चक्कर आली व तो कोसळला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वडिलांना माहिती देताच पायाखालची वाळू घसरली, धावत रूग्णालय गाठले. दरम्यान, चार दिवसांपुर्वी एका २१ वर्षीय मुलीचा डान्स करताना मृत्यू झाला होता. आठवड्यातच दुसरी घटना समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे.