पाकिस्तानात पित्याकडून मुलीची हत्या
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाकिस्तानात ऑनर किलिंगचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. तेथे एका पित्याने स्वत:च्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली आहे. अलिकडेच या मुलीचा परिवार अमेरिकेतून पाकिस्तानात दाखल झाला होता. आरोपी पित्याचे नाव अनवर उल-हक असून त्याने बलुचिस्तानच्या क्वेटामध्ये एका रस्त्यावर स्वत:च्या मुलीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली आहे. चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. एका अज्ञात इसमाने गोळी झाडून मुलीची हत्या केल्याचा दावा त्याने केला होता. परंतु प्रारंभिक तपासानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने अमेरिकेने जन्मलेल्या स्वत:च्या मुलीच्या हत्येचा गुन्हा मान्य केला.
मुलीचे कपडे, राहणीमान आणि लोकांना भेटण्याच्या सवयीमुळे तिचा परिवार अत्यंत नाराज होता. मृत मुलीचा मोबाइल हस्तगत केला असून ऑनर किलिंग समवेत सर्व पैलूंचा तपास केला जात असल्याची माहिती पोलीस अधिकारी जोहैब मोहसिन यांनी दिली आहे. आरोपी पिता स्वत:च्या मुलीच्या टिकटॉक वापरामुळे अत्यंत नाराज होता आणि तिच्या हत्येमागे हेच सर्वात मोठे कारण होते असे समोर आले आहे. संबंधित परिवार अलिकडेच अमेरिकेत सुमारे 25 वर्षांपर्यंत वास्तव्य केल्यावर बलुचिस्तान प्रांतात परतला होता. संशयिताकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. तसेच त्याची मृत मुलगी देखील अमेरिकन नागरिक होती. अमेरिकेत राहत असताना ती सातत्याने टिकटॉकवर व्हिडिओ पोस्ट करत होती.
कट्टरवाद्यांमध्ये टिकटॉकवरून नाराजी
पाकिस्तानात परतल्यावरही माझी 15 वर्षीय मुलगी सातत्याने टिकटॉकवर व्हिडिओ पोस्ट करत होती असा दावा आरोपीने केला आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी मुलीच्या काकालाही अटक केली आहे. पाकिस्तानात टिकटॉकवर विरोधात कट्टरवादी नेहमीच आवाज उठवत असतात. तरीही पाकिस्तानात सुमारे 5.5 कोटी लोक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. मागील काही वर्षांमध्ये पाकिस्तानच्या सरकारने अनेकदा टिकटॉकवर बंदी घातली आहे, परंतु चीनच्या दबावामुळे दरवेळी ही बंदी हटवावी लागली आहे.