For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमी गुण मिळाल्याने बापाने केला मुलीचा खून

11:17 AM Jun 23, 2025 IST | Radhika Patil
कमी गुण मिळाल्याने बापाने केला मुलीचा खून
Advertisement

आटपाडी :

Advertisement

कॉलेजमधील नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने राग अनावर झालेल्या शिक्षक बापाने पोटच्या मुलीचाच बळी घेतला. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे हा प्रकार घडला. वडीलांनी जात्याच्या लाकडी खुंट्याने केलेल्या बेदम मारहाणीत साधना धोंडीराम भोसले ही इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी ठार झाली. याप्रकरणी माध्यमिक शिक्षक असलेल्या धोंडीराम भगवान भोसले (रा. नेलकरंजी) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील माध्यमिक शिक्षक धोंडीराम भोसले यांची कन्या साधना ही मुलगी आटपाडीमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती. मागील तीन वर्षापासून ती आटपाडीत राहून कॉलेजमध्ये नीटचे धडे गिरवत होती. गावातील हायस्कुलमध्ये इयत्ता दहावीत पहिल्या आलेल्या साधनाकडून तिच्या कुटुंबियांची मोठी अपेक्षा होती. घरातील छोटेखानी कार्यक्रमासाठी साधना भोसले हिला होस्टलमधून कुटुंबियांनी गावी नेलकरंजी येथे बोलावून घेतले होते.

Advertisement

कॉलेजमधील टेस्टमध्ये तिला कमी मार्क्स मिळाल्याने शिक्षक असलेल्या वडीलांनी नाराजी व्यक्त करत साधनाला शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बेदम मारहाण करण्यात आली. वडील धोंडीराम भोसले यांनी जात्याचे लाकडी खुंटीने मुलीला मारहाण केल्याने साधना ही गंभीर जखमी होवून बेशुध्द झाली. त्यानंतर तिला कुटुंबियांनी आटपाडीतील खासगी दवाखान्यात दाखल केले. येथे उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने तातडीने सांगली हलविण्यात आले.

सांगलीमधील दवाखान्यात तिला मृत घोषित करण्यात आले. लाकडी खुंटीने झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. मृत साधना हिचे शवविच्छेदन केल्यानंतर तिला संपर्ण अंगभर बेदम मारहाणीने झालेली इजा अत्यंत गंभीर असल्याचे व त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी रात्री उशिरा तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुलीला मारहाण करून तिचा खून केल्याप्रकरणी साधनाची आई प्रीती धोंडीराम भोसले यांनी पती धोंडीराम यांच्याविरोधात आटपाडी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार आटपाडी पोलिसात रविवारी पहाटे धोंडीराम भोसले यांच्यावर खुनासह ज्युवेनाईल् जस्टिस अॅक्ट 2015 च्या कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी तत्काळ हालचाली करत मुलीच्या खुनप्रकरणी धोंडीराम भोसले याला अटक केली.

त्याला न्यायालयात हजर केले असते 24 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. चाचणी परीक्षेत मार्क कमी मिळाल्याच्या कारणावरून गंभीर मारहाण करून मुलीचा बळी घेण्याच्या या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. शिक्षकी पेशा असलेल्या वडीलानेच केलेली कृती गंभीर विचार करायला लावणारी आहे.

विशेष म्हणजे शनिवारी सकाळी शिक्षक धोंडीराम भोसले यांनी शाळेत योगदिनात सहभाग नोंदविला होता. त्याचवेळी साधना ही मात्र दवाखान्यात शेवटच्या घटका मोजत होती. तर काळाच्या पोटात काही वेगळेच घडत होते. केवळ गुणांसाठी झालेल्या अमानुष मारहाणीत हुशार असलेल्या मुलीचा बळी जाण्याच्या घटनेने समाजमन सुन्न झाले. मागील काही वर्षात मुलांप्रति पालकांच्या शैक्षणिक अपेक्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. स्पर्धेचे युग असल्याने जीईई, नीटसह अन्य स्पर्धा परीक्षांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जादाचे तास, विविध अकॅडमीच्या माध्यमातुन मुले बारावीनंतर मेडीकल, इंजिनिअरिंगसह विविध क्षेत्रासाठी नशिब आजमावताहेत. परंतु यामध्ये अपेक्षांची पुर्तता न झाल्याने अनेक मुलांचा बळी जात असल्याची वस्तुस्थितीही दिवसेंदिवस गंभीर बनली आहे. याच अपेक्षेमुळे नेलकरंजीमध्ये शिक्षक असलेल्या पित्यानेच मुलीचा खून केल्याची ह्य्दयद्रावक व संतापजनक घटना घडली.

  • कुटुंबाला शैक्षणिक वारसा

खुनाची घटना घडलेल्या नेलकरंजीतील भोसले कुटुंबियांना मोठा शैक्षणिक वारसा आहे. गुन्हा दाखल असलेले माध्यमिक शिक्षक धोंडीराम भोसले यांचे वडील एका शिक्षण संस्थेचे पदाधिकारी होते. तर धोंडीराम भोसले हे गावातीलच हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. त्याच कुटुंबातील इयत्ता दहावीमध्ये पहिली आलेली साधना बारावीनंतरच्या परीक्षांसाठी होस्टलमध्ये राहून तयारी करत होती. परंतु टेस्टमधील कमी गुणांनी तिच्या आयुष्याचा शेवट झाला.
..

Advertisement
Tags :

.