For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दैवी स्वभावाची बारा वैशिष्ट्यो बाप्पानी सांगितली आहेत

06:50 AM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
दैवी स्वभावाची बारा वैशिष्ट्यो बाप्पानी सांगितली आहेत
Advertisement

अध्याय दहावा

Advertisement

पूर्वकर्मानुसार माणसाचा स्वभाव ठरतो. माणसाच्या स्वभावात सत्व, रज आणि तम यापैकी कोणत्या तरी एका गुणाचा जास्त प्रभाव असतो. त्या प्रभावानुसार माणसाच्या स्वभावाची दैवी, आसुरी आणि राक्षसी या तीन प्रकारात बाप्पानी विभागणी केलेली आहे. जन्मत: मानवी स्वभावात वरील त्रिगुणांची साम्यावस्था ईश्वराने साधलेली असते म्हणून लहान मुले निरागस असतात. पण मनुष्य जसजसा मोठा होत जातो तसतसा त्याला स्वार्थ कळू लागतो आणि तो जास्तीतजास्त साधण्यासाठी त्याची धडपड सुरू होते. त्यामुळे त्याच्यातील रज व तम गुण प्रभावी ठरू लागतात. अहंकार जोर करून मी कर्ता आहे ही भावना प्रबळ होते. ईश्वराला अहंकारी माणसे बिलकुल आवडत नाहीत त्यामुळे तो त्यांना दुरावतो. हे लक्षात घेऊन ज्याला मुक्ती हवी आहे त्याने त्याच्यातील रज व तम गुणांना नियंत्रित करून मर्यादित ठेवण्यासाठी सत्वगुणाची वाढ करणं आवश्यक आहे. माणसाच्या तिन्ही स्वभावांची वैशिष्ट्यो सांगणारे श्लोक आपण अभ्यासत आहोत.

दैवी, आसुरी आणि राक्षसी या तीन प्रकाराच्या स्वभावाबद्दल सांगताना बाप्पा म्हणाले, पहिला म्हणजे दैवी स्वभाव घेऊन जर मनुष्य जन्माला आलेला असेल तर त्याला मुक्ती मिळते आणि उरलेले दोन प्रकारचे स्वभाव माणसाला बंधनात टाकतात. माणसाचा स्वभाव सहसा बदलत नाही परंतु आत्म्याचं परमात्म्याशी मिलन घडवून आणणे हा बाप्पानी सांगितलेला सर्वोत्तम योग साधण्यासाठी आसुरी अथवा राक्षसी स्वभावाचे गुणधर्म जर आपल्यात असतील तर त्यांना नियंत्रित करणे आवश्यक आहे. त्यापुढे जाऊन दैवी स्वभावाच्या गुणांचा उत्कर्ष करण्याची गरज आहे. हे सर्व लक्षात घेऊन आपण तिन्ही प्रकारच्या स्वभावांची वैशिष्ट्यो आपण अभ्यासणार आहोत.

Advertisement

रज व तमोगुणाचा संपूर्ण नाश करणं अशक्य आहे. कारण प्रत्येकाच्या स्वभावात त्यांचा समावेश असतोच आणि ज्याअर्थी ईश्वराने त्यांचा समावेश मानवी स्वभावात केला आहे त्याअर्थी ते आवश्यक असणार हे नक्की. परमार्थ साधनेत त्यांचा उपयोग कसा करून घेता येतो कसे ते सांगतो. रजोगुणामुळे माणसाला राग लवकर येतो. एखाद्या दिवशी आपलं साधनाकडं दुर्लक्ष झालं तर स्वत:च स्वत:वर रागवावं म्हणजे दुसऱ्या दिवशी साधना चांगली होईल. तमोगुणी माणसाला मी करतोय तेच बरोबर आहे असं वाटत असतं. आपल्यातल्या तमोगुणाचा उपयोग करून घेऊन कुणी कितीही नावं ठेवली तरी आपण साधना करतोय ते बरोबरच आहे हे लक्षात घेऊन आपलीं साधना आपण नेटानं चालू ठेवावी. थोडक्यात आपलं ईश्वरप्राप्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्या स्वभावात असलेल्या रज व तम गुणांना मर्यादित करून जे काही थोड्याफार प्रमाणात ते शिल्लक उरतात त्यांचा उद्दिष्टपूर्तीसाठी उपयोग करून घ्यावा. रज तम गुणांना मर्यादित ठेवण्यासाठी सत्वगुणाची मात्रा वाढवणं हा राजमार्ग आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्यासाठी सत्वगुणाचा प्रभाव असलेल्या दैवी स्वभावाचा माणूस कसा असतो त्याचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत.

दैवी स्वभावाची बारा वैशिष्ट्यो बाप्पानी सांगितली आहेत. ही नितीशास्त्रातली बारा सुंदर रत्ने आहेत. ही सर्व वैशिष्ट्यो एकमेकांना पुढे नेत असतात. थोडक्यात एक जरी संपुर्ण आत्मसात झाले तरी इतर वैशिष्ट्यांचा आपोआपच स्वभावात समावेश होतो. सर्वांशी समदृष्टीने वागणे हा दैवी स्वभावाच्या माणसाचा सहजभाव असतो. समदृष्टी म्हणजे ज्याच्याशी जसं वागायला पाहिजे त्याप्रमाणे वागणे. श्रीरामांनी त्यांच्या आदर्श वर्तनाने याचा उत्तम धडा घालून दिलेला आहे. श्रीरामाना समोर ठेवून आपण दैवी स्वभावाचा माणूस कसा ओळखायचा याचा आपण अभ्यास करू.

क्रमश:

Advertisement
Tags :

.