फादर एडी फुटबॉल स्पर्धा 9 पासून
बेळगाव : पॉलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाइडतर्फे सेंट पॉल्स हायस्कूलच्या सहकार्याने 56 व्या फादर एडी स्मृतिचषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा 9 ते 15 सप्टेंबर सेंट पॉल्स हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे, अशी माहिती सेंट पॉल्सचे प्राचार्य सायमन फर्नाडिस यांनी दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चषकांचे अनावरण करण्यात आले. सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दिवंगत भीमराज निपाणीकर यांच्या स्मरणार्थ स्पर्धा वेगळी असेल. महिलांचा प्रदर्शनीय फुटबॉल सामना स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असेल.
हा सामना निशा छाब्रिया यांच्या स्मरणार्थ होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते होणारआहे. पुढील वर्षीपासून महिला फुटबॉल स्पर्धा आयोजनाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष अमित पाटील म्हणाले, शहरातील 26 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. यावेळी विशेष वैयक्तिक बक्षिसेही देण्यात येतील. त्यात सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक, सर्वोत्कृष्ट संघ आदींचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
सेंट पॉल्सचे प्राचार्य फादर सायमन फर्नांडीस यांनी फादर एडी यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन स्पर्धेमागचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्यांना देण्यात चषकांचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य फादर अलेंड्रो दाकोस्टा, पीबीडब्ल्यूचे उपाध्यक्ष परेश मुरकुटे, सचिव अनिकेत क्षत्रिय, पुरस्कर्ते किरण निपाणीकर, इन बेलगामचे सीईओ रजनीश तडकोडकर, सेंट पॉल्सचे क्रीडा शिक्षक अॅन्थनी डिसोजा, बाळेश विनायक धामणेकर यांच्यासह विविध शाळांचे क्रीडा शिक्षक व संघांचे कर्णधार उपस्थित होते.