घटप्रभा नदीत बुडून पिता-पुत्रांचा मृत्यू
मासेमारी करताना दुर्घटना : दोन्ही मुलांचे मृतदेह हाती : वडिलांच्या मृतदेहाचा शोध जारी : यमकनमर्डी पोलिसांत घटनेची नोंद
वार्ताहर/यमकनमर्डी
हिडकल जलाशयातील बॅक वॉटरमध्ये पिता व दोन मुले मासे पकडण्यासाठी घटप्रभा नदीवर गेले होते. मासे पकडताना अचानक एका मुलाचा तोल नदीत गेला. त्यावेळी त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या अन्य दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना 17 रोजी सायंकाळी बेनकनहोळीनजीक घटप्रभा नदी परिसरात घडली. लक्ष्मण रामा अंबली (वय 49), रमेश अंबली (वय 14) व यल्लाप्पा अंबली (वय 12, रा. बेनकनहोळी, ता. हुक्केरी) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान यल्लाप्पा व रमेश यांचे मृतदेह सापडले असून लक्ष्मण अंबली यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
या घटनेसंदर्भात समजलेली माहिती अशी, लक्ष्मण हे आपल्या दोन मुलांसह मासे पकडण्यासाठी नदीवर गेले होते. मासे पकडत असताना त्या तिघांपैकी एकाचा अचानक नदीपात्रात तोल गेला. त्यामुळे एकास एक वाचवण्यास गेल्याने तिघांचाही नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी मासे पकडण्यास गेलेले तिघेजण सोमवारी सकाळपर्यंत घरी परतलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी यमकनमर्डी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
त्याची दखल घेत यमकनमर्डी पोलीस स्थानकाचे सीपीआय जावेद मुशापुरी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी यमकनमर्डीच्या अग्निशमन दल व बेळगाव येथील एनडीआरएफच्या टीमला पाचारण केले. एनडीआरएफ, अग्निशमन व यमकनमर्डी पोलिसांनी बोटीच्या मदतीने मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान यल्लाप्पा व रमेश यांचे मृतदेह सापडले असून लक्ष्मण अंबली यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिसांत झाली आहे.