Solapur News : टेंभुर्णी येथे लोखंडी पाईपने पिता-पुत्रास मारहाण
परितवाडी येथे लोखंडी पाईपने वडील-मुलावर मारहाण
टेंभुर्णी : माढा तालुक्यातील परितवाडी येथे शुल्लक कारणावरून एकास लोखंडी पाईपने मारहाण करुन वडील व मुलगा जखमी झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गणेश साहेबराव कदम (वय ३७, रा. परितेवाडी, ता. माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्नील शिवाजी गायकवाड (रा. परितवाडी, ता. माढा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गणेश कदम हे गायीचे धार काढून घरासमोर थांबले असताना स्वप्नील गायकवाड तेथे आला.
त्याने'तुझा भाऊ किरण कुठे आहे? माझ्या वडिलांना तुझ्या भावाने इंदापुरला का घेऊन गेला?' असे म्हणत शिवीगाळ सुरू केली.
फिर्यादीने समजावण्याचा प्रयत्न करताच आरोपीने तुला आता बघायचे आहे, असे धमकावत हातातील पोकळ लोखंडी पाईपने फिर्यादीच्या डोक्यावर, पायावर मारुन जखमी केले.
भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीचा मुलगा रोहन, पत्नी कल्पना, भावजय स्वाती व विष्णू कदम हे धावून आले असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ केली. यावेळी रोहन याच्या डोक्यावरही लोखंडी पाईपने मारुन त्यास जखमी केले. याबाबत टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.