बोलिवियात बसेसची भीषण टक्कर
37 जणांचा मृत्यू : 39 जण जखमी
वृत्तसंस्था/ सूक्रे
बोलिवियात भीषण बसदुर्घटना घडली आहे. दोन प्रवासी बसेसची टक्कर झाल्याने कमीतकमी 37 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 39 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे, अशा स्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ही बस दुर्घटना उयूनीनजीक घडली आहे. उयूनीला सालार दे उयूनीचे प्रवेशद्वार म्हटल जाते. सालार दे उयूनी हे जगातील सर्वात मोठे मीठागार आहे. तसेच ते प्रमुख पर्यटनस्थळ देखील आहे.
दुर्घटनाग्रस्त बसपैकी एक बस ओरुरोच्या दिशेने प्रवास करत होती. ओरुरोमध्ये दक्षिण अमेरिकेतील सर्वात महत्त्वपूर्ण कार्निव्हल सोहळा सुरू आहे. दुर्घटनेनंतर पोलीस अन् प्रशासनाने बचावकार्य राबविले आहे. दोन्ही बसचे चालक दुर्घटनेत बचावले आहेत. प्रवाशांनी एका चालकाला मद्यपान करताना पाहिले होते. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतल्यावर दोषींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बोलिवियाच्या पर्वतीय भागांमध्ये दुर्घटना होण्याचे प्रमाण अधिक आहे. येथील रस्त्यांची खराब अवस्था देखील दुर्घटनांसाठी कारणीभूत आहे. या क्षेत्रात दरवर्षी सरासरी 1400 लोकांचा रस्ते दुर्घटनांमध्ये मृत्यू होतो. बोलिवियातील रस्ते सर्वात धोकादायक मानले जातात.