Kupwad Crime News | कुपवाडतील दत्तनगर परिसरात धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला
पूर्वीच्या भांडणाच्या रागातून चौघांनी तिघांवर प्राणघातक हल्ला
कुपवाड - पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून बामणोली हद्दीतील दत्तनगर परिसरात मंगळवारी रात्री चौघांनी मिळून तिघांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यात रवींद्र धोंडीराम माळी (वय ३४, रा. बामणोली), प्रमोद माने व अविनाश देशमुख हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संशयित आनंद राजू यमगर, अजय शेळके, विकास लक्ष्मण जाधव व राहुल विठ्ठल चव्हाण (सर्व रा. बामणोली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी संशयीतांचा शोध घेऊन दोघाना ताब्यात घेतले आहे. अन्य संशयित फरार असून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिस करत आहे. पोलिसांनी खुनी हल्ल्यातील चार एडके, एक लाकडी दांडके जप्त केले आहे. त्यांच्याविरोधात जखमी रवींद्र माळी यांनी फिर्यादी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जखमी तिघांसोबत संशयित विकास जाधव याच्याशी दोन महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास दत्तनगर (बामणोली) परिसरात एका कारखान्या शेजारी कोपऱ्यावर फिर्यादी रवींद्र माळी व त्याचे दोन मित्र प्रमोद माने व अविनाश देशमुख हे तिघे थांबले होते. यावेळी संशयित चौघे तिथे आले. पूर्वीच्या भांडणाच्या रागातून संशयित आनंद यमगर, अजय शेळके, विकास जाधव व राहुल चव्हाण या चौघांनी शिवीगाळ, दमदाटी करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील धारदार एडक्याने व लाकडी दांडक्याने रवींद्र माळी, प्रमोद माने, अविनाश देशमुख या तिघांवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर संशयित शस्त्रे तिथेच टाकून पसार झाले.