जुन्या भांडणाच्या कारणावरुन युवकावर जीवघेणा हल्ला
सातारा :
डबेवाडी(ता. सातारा) गावातील युवकाला जुन्या भांडणाच्या कारणावरुन गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास काही युवकांनी धारदार हत्यारानी मारहाण करुन गंभीर जखमी केले. करण ज्योतीराम चव्हाण(वय 20) असे त्याचे नाव आहे. त्याला ग्रामस्थांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोन-तीन दिवसापूर्वी करण चव्हाण यांची एका युवकाबरोबर भांडणे झाली होती. त्याने या युवकाला मारहाण केली. यांचा राग मनात धरुन त्या युवकाने इतर मित्रांना सोबत घेऊन गुरुवारी रात्री डबेवाडी गावात गेला. यावेळी करण हा दुकानात बसला होता. या युवकांनी त्याला दुकानातून बाहेर ओढून मारहाण करायला सुरुवात केली. करण हा आरडाओरडा करु लागल्याने त्यांच्या डोक्यात हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यानी करण जवळ धाव घेतली. हे पाहून युवकांनी तेथून पळ काढला. ग्रामस्थांनी करणला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सातारा तालुका पोलिसांनी रुग्णालयात जावून त्याचा जबाब घेतला असून त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिली.