Satara News | साताऱ्यात माणुसकीला काळिमा; अज्ञाताने मुक्या श्वानावर केला जीवघेणा हल्ला
सातारा - सातारा शहरातील टॅक्सी गल्ली परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी एका अज्ञात व्यक्तीने भटक्या मुक्या श्वानावर धारदार चाकूने वार केल्याची घटना समोर आली असून, या अमानुष हल्ल्यात श्वान गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टॅक्सी गल्ली परिसरात राहणाऱ्या भटक्या श्वानावर अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे चाकूने वार करून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी श्वानाला उपचारासाठी सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी श्वानावर उपचार सुरू केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेचा परिसरातील नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मुक्या प्राण्यावर अशा प्रकारची क्रूरता करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे.घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून हल्लेखोराचा शोध घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच संबंधिताविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार आणि लागू असलेल्या भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी प्राणीप्रेमी संघटनांनी केली आहे.
मुक्या प्राण्यांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे