For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आष्ट्यात घरपट्टी वसुली पथकावर जीवघेणा हल्ला; प्रशासकीय अधिकाऱ्याला भरचौकात मारहाण

01:10 PM Mar 19, 2026 IST | NEETA POTDAR
आष्ट्यात घरपट्टी वसुली पथकावर जीवघेणा हल्ला  प्रशासकीय अधिकाऱ्याला भरचौकात मारहाण
Advertisement

                     आष्टा नगरपरिषद पथकावर हल्ला

Advertisement

आष्टा -आष्टा शहरात थकीत घरपट्टी वसुलीसाठी गेलेल्या नगरपरिषद पथकावर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी घडली. पालिकेच्या पथकाने सील केलेले गाळे बेकायदेशीरपणे उघडून, विचारणा करण्यासाठी गेलेल्या करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी रघुनाथ महादेव मोहिते (रा. कोरेगाव) यांना मारहाण करण्यात आली. याप्रप्रकरणी संशयित आरोपी पोपट भानुसे (रा. आष्टा) याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आष्टा नगरपरिषदेच्या वतीने सध्या थकीत घरपट्टी वसुलीची धडक मोहीम राबवण्यात येत आहे. बुधवार, १८ मार्च रोजी दुपारी प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते हे पथकासह आष्टा एस.टी. स्टैंड परिसरातील पश्चिम बाजूस बसुलीसाठी गेले होते.या पथकात बसुली लिपीक दिलीप ढोले, संजय पाखरे, पियुष नेर्लेकर, कार्यालयीन अधीक्षक प्रियंका भोसले, सहाय्यक कर निरीक्षक पूजा पाटील, प्रकल्प अधिकारी शिरीष काळे आणि कर्मचारी वैभव कांबळे, विशाल कांबळे, धनाजी नलवडे यांचा समावेश होता.

Advertisement

एस.टी. स्टैंड परिसरातील 'सातपुते बुक सेलर्स' आणि 'अशुतोष फूटवेअर' या दोन गाळ्यांकडे मोठी थकबाकी असल्याने पालिकेच्या पथकाने हे दोन्ही गाळे रीतसर पंचनामा करून सील केले होते. त्यानंतर पथक पुढील कारवाईसाठी अन्य ठिकाणी गेले. काही वेळाने पथक पुन्हा त्या परिसरातून जात असताना, सील केलेले दोन्ही गाळे उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत 'सील कोणी तोडले?' अशी विचारणा केली असता, तेथे उपस्थित असलेला आरोपी पोपट भानुसेने गाळ्यांचे सील मीच तोडले आहे, असे सांगून हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयित आरोपीने फिर्यादी रघुनाथ मोहिते यांच्या तोंडावर, नाकावर आणि डोळ्यावर बुक्की मारली. मोहिते जमिनीवर कोसळले असता, आरोपीने बाजूला पडलेली काठी उचलून त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. पुन्हा गाळे सील करण्यासाठी आलात तर तुमचे पाय मोडून टाकीन, अशी धमकी देत त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेनंतर रघुनाथ मोहिते यांनी आष्टा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी पोपट भानुसे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Tags :

.