मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
कुत्रा आडवा आल्याने कार भिंतीला धडकली, महिलेचा मृत्यू
कणकवली /वार्ताहर
मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा येथे शनिवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला. रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार उड्डाणपुलाच्या संरक्षण भिंतीला जोरदार धडकली. या अपघातात विक्रोळी येथील मीरा सचिन सावंत (४७) यांचा मृत्यू झाला आहे.विक्रोळी येथील सावंत कुटुंब आपल्या खाजगी कारने सिंधुदुर्गातील हिर्लोक - वेताळ बांबर्डे येथे जाण्यासाठी शुक्रवारी रात्री निघाले होते. शनिवारी सकाळी नांदगाव येथे आले असता हा अपघात घडला. धडक इतकी जोरात होती की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.या अपघातात चालक सचिन भास्कर सावंत (५०) आणि त्यांची पुतणी सानिका समीर सावंत (२४, रा. वसई) हे गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना कारमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. कणकवली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.