Solapur Accident | ईट-डोकेवाडी रस्त्यावर भीषण अपघात
03:50 PM Jun 04, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
ईट : भूम तालुक्यातील ईट-डोकेवाडी मार्गावर सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पांढरेवाडी फाट्याजवळील उताराच्या वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला.
नागेवाडी येथील बाबासाहेब चांगदेव लांडे (वय ३८) व सचिन आश्रू चव्हाण (वय ३०) हे दुचाकीवरून डोकेवाडीहून नागेवाडीकडे जात होते. त्याचवेळी डोकेवाडी येथील कृष्णा चंद्रभान गडराव (वय ४२) हे स्वतःच्या दुचाकीवरून डोकेवाडीकडे परत येत होते. ईट-डोकेवाडी मार्गावरील पांढरेवाडी फाट्याजवळील उताराच्या वळणावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, बाबासाहेब लांडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बार्शी येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
त्यांच्या निधनामुळे नागेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातातील दुसरे जखमी सचिन चव्हाण यांच्यावर बार्शी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तर कृष्णा गडराव यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Advertisement
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पांढरेवाडी फाट्याजवळील वळण धोकादायक असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली असून आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मृत बाबासाहेब लांडे यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने नागेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.