Kagal accident | कागलजवळ महामार्गावर भीषण अपघात; चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे–बेंगलोर महामार्गावर भीषण धडक, एक ठार
कागल : पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागलजवळ रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे . दादासो महादेव सोनुले ( वय ४४, रा. वंदूर, ता. कागल) असे त्यांचे नाव आहे .तर बोलेरो जीप मधील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत . बोलेरो आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्यानंतर बोलेरो पलटी झाली . याप्रकरणी कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कागल येथील हुच्चे मळ्याजवळ रविवारी सकाळी नऊ वाजता ही दुर्घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, दत्ता भरत शिंदे (वय ४२, रा. बरसगाव दुमाला, ता. धाराशिव) यांच्यासह मनीषा आगळे व मानवी आगळे यांच्यासह सहाजण बोलेरोमधून पहाटे आदमापूर येथे बाळूमामांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना कागल येथील हुच्चे मळ्याजवळ समोरून चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी आणि बोलेरो जीप यांच्यात जोराची धडक झाली . धडक इतकी जोरदार होती की, बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या सखल भागात बोलेरो पलटी झाली. तसेच दुचाकी ही सखल भागात जाऊन पडली .
या अपघातात बोलेरोमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीही सखल भागात कोसळली . दुचाकीस्वार दादासो सोनुले (रा. वंदूर, ता. कागल) हेही गंभीर जखमी झाले उपचाराकरिता त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . जखमींवर उपचार सुरू आहेत.
दत्ता शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार दादासो सोनुले यांनी निष्काळजीपणे व चुकीच्या दिशेने वाहन चालवत बोलेरोला धडक दिल्याने अपघात घडला. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. पुढील तपास कागल पोलिस करत आहेत.