Kolhapur News : आजरा जवळ भीषण अपघात; गडहिंग्लजमधील दोन तरुणांचा मृत्यू
गडहिंग्लज तालुक्यावर शोककळा
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील सोलापुरे आणि कांबळे कुटुंबे भाजीपाल्याच्या व्यवसायासाठी जात असताना झालेल्या अपघातात मुलगा मनिष ठार झाला. मनिषचे आई-वडील मागे दुसऱ्या गाडीत राहिले अन, मनिष गाडी घेऊन पुढे येत असताना आजरा शहराजवळ झालेल्या अपघातात मनीष सोलापुरे आणि कृष्णा कांबळे यांना जीव गमवावा लागला. या घटनेने सोलापुरे आणि कांबळे कुटुंबावर दुःख कोसळले आहे.
मंगळवारी सावंतवाडीचा (जि. सिंधुदूर्ग) आठवडी बाजारासाठी आई-वडील, मनिष सोलापुरे, कृष्णा कांबळे. पत्नी गीता कांबळे भाजीपाला विक्रीसाठी गेले होते. आई-वडील भाजीपाला शिल्लक असल्याने मागे राहिले. दुसऱ्या गाडीने येतो, असे सांगितल्याने ओमनी गाडीतून मनिष, कृष्णा आणि पत्नी गीता कांबळे रात्री गावी गडहिंग्लजला येत होते. याचवेळी संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्गावर सुलगाव फाट्याजवळ आजऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर आणि गडहिंग्लजच्या दिशेने येणाऱ्या ओमनी कारची धडक झाली. यात मनिष सोलापूरे, कृष्णा कांबळेला प्राण गमवावा लागला आहे. तर गीता कांबळे या गंभीर जखमी झाल्या असून उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे.