भाजप पदाधिकाऱ्याच्या विरोधात भाजपच्याच कार्यकर्त्याचे सावंतवाडीत उपोषण
अनधिकृत बांधकाम आणि बंदूकधारी बाऊन्सर ठेवणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी
भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांच्या विरोधात भाजपचेच क्लेट्स फर्नांडिस हे कार्यकर्ते येथील पोलीस ठाण्याचा समोर उपोषणास बसले आहे. भाजपच्या या युवा पदाधिकाऱ्याने अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तसेच या युवा पदाधिकाऱ्याने आपल्या निवासस्थानी बंदूकधारी सिक्युरिटी गार्ड ठेवल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने अनधिकृत बांधकामाची तसेच दहशतीबाबत चौकशी करून संबंधित पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी यासाठी फर्नांडिस उपोषणास बसले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख नारायण राणे, शहर प्रमुख बाबू कडतुरकर ,माजी नगरसेविका आनारोजिन लोबो, यांनी ही भेट घेऊन माहिती घेतली दरम्यान पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी फर्नांडीस यांना नोटीस दिली आहे. त्यात त्यांनी संबंधित युवा भाजप पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी कोणती बंदूकधारी व्यक्ती नाही तसेच तेथील रहिवाशांची चौकशी केली असता कुणीही कुठल्याही प्रकारची दहशत करीत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उपोषण तुमच्या जबाबदारीवर करावे. कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यात आपल्याला जबाबदार धरण्यात येईल असे फर्नांडीस याना दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे.