घोटगेवाडी कालव्याच्या कोसळलेल्या पाईपलाईनच्या ठिकाणी प्रजासत्ताकदिनी आमरण उपोषण
उपोषणात घोटगे सरपंच,उपसरपंचांसह घोटगे परमे येथील शेतकऱ्यांचा सहभाग
(साटेली भेडशी प्रतिनिधी)
तिलारी धरण प्रकल्पांतर्गत बांधलेल्या उजव्या कालव्याची पाईपलाईन कोसळली. या कामाची चौकशी होऊन कोसळलेली पाईपलाईन ताबडतोब दुरुस्त करण्यासाठी 26 जानेवारी रोजी कोसळलेल्या पाईपलाईन ठिकाणी घोटगेवाडी येथे आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन घोटगे सरपंच,उपसरपंच आणि घोटगे परमे गावातील शेतकरी बागायतदार यांनी दिले आहे.
पाण्याअभावी केळी बागायतींचे मोठे नुकसान होणार असून याला तिलारी कालवा विभाग व कालवा विभागाचे सहा.अभियंता , उपअभियंता किरण मेहत्रे व कनिष्ठ अभियंता उत्तम तुरंभेकर हेच जबाबदार आहे असा आरोप केला.यावेळी तहसीलदार दोडामार्ग यांच्याशी चर्चा करताना सरपंच भक्ती दळवी, उपसरपंच विजय दळवी, विठ्ठल दळवी,भरत दळवी, सतीश दळवी,अरुण दळवी, देऊ दळवी, सतीश परब आदी शेतकरी बांधव उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या तहसीलदार यांच्याकडे मांडल्या. त्यानंतर तहसीलदार यांनी तिलारी कार्यकारी अभियंता यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून दहा दिवसात कालव्यातील फुटलेली पाईप लाईन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.