For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काश्मीर विधानसभेत फॅशन शोमुळे गदारोळ

06:05 AM Mar 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
काश्मीर विधानसभेत फॅशन शोमुळे गदारोळ
Advertisement

वृत्तसंस्था / .श्रीनगर

Advertisement

रमझानच्या काळात काश्मीर खोऱ्यातील गुलमर्ग येथे जाहीररित्या एका फॅशन शोचे आयोजन करण्यात आल्याने या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विधानसभेत दिले. मात्र या फॅशन शोमध्ये आपल्या पक्षाचा हात असल्याच्या आरोपाचा त्यांनी सोमवारी इन्कार केला आहे.

सोमवारी सकाळी विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर काँग्रेस, पीडीपी आणि सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सच्या अनेक आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला. दोन अपक्ष आमदारांनीही या घटनेचा निषेध केला. रमझानचा पवित्र महिना सुरु असताना आणि लोक उपास करीत असताना असा फॅशनशो कसा आयोजित केला गेला, अशी पृच्छा विरोधी सदस्यांनी केली. सरकारने या शोला अनुमती कशी दिली, असे अनेक प्रश्न मुख्यमंत्री अब्दुल्ला यांना विचारण्यात आले होते.

Advertisement

भाजपकडून शोचे समर्थन

या केंद्रशासित प्रदेशात प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका साकारत असलेल्या भारतीय जनता पक्षाने मात्र, या फॅशनशोचे समर्थन केले. राज्य सरकार अशा शोवर बंदी घालू शकत नाही. सर्वांना त्यांच्या आवडीविडी प्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. केवळ एका विशिष्ट धर्माच्या आधारे अशा कार्यक्रमांना विरोध केला जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाने विधानसभेत केले.

विरोधकांवर टीका

भारतीय जनता पक्षाने या संदर्भात काँग्रेस, पीडीपी आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार टीकेची झोड उठविली. तसेच काही मुस्लीम धार्मिक नेत्यांवरही टीका केली. त्यामुळे विधानसभेत जवळपास अर्धा तास विरोधी पक्षांमध्येच जोरदार शब्दयुद्ध पहावयास मिळाले. काश्मीर खोऱ्यात पुन्हा संकुचित विचारसरणीची आग भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीत आपला अधिकार उपयोगात आणण्याची संधी मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे आमदार रणबीरसिंग पठाणीया यांनी केले. अन्य विरोधी पक्षांचा त्यांनी जोरदार निषेध केला.

Advertisement
Tags :

.