फारुख अब्दुल्लांची पाकिस्तानवर टीका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काश्मीर बळकाविण्याचे पाकिस्तानचे स्वप्न कधीही साकार होणार नाही, असा इशारा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी दिला आहे. ते जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. अलिकडच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये परप्रांतीयांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद यासाठी कारणीभूत आहे. पाकिस्ताने भारताचा द्वेष करणे सोडून द्यावे आणि भारताशी मैत्री करण्याचे मार्ग शोधावेत असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
काश्मीर प्रश्नावर स्थायी तोडगा निघाल्याशिवाय येथील दहशतवाद थांबणार नाही. या दहशतवादाला पाकिस्तान जबाबदार आहे. पाकिस्ताने शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न कधी केला नाही. हा प्रश्न दहशतवादाच्या मार्गाने नव्हे, तर शांततेच्या मार्गानेच चर्चेद्वारे सुटू शकतो. 1984 पासून काश्मीरमध्ये दहशतवाद असून आजही स्थितीत बदल झालेला नाही. मी ही स्थिती गेल्या चाळीस वर्षांपासून पहात आहे. कोणत्याही परिस्थितीत जम्मू-काश्मीर पाकिस्तानचा भाग होणार नाही, हे त्या देशाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. ही स्थिती असताना पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवाद का फैलावत आहे, हे अनाकलनीय आहे. पाकिस्तानने शांततेचा मार्ग अवलंबावा, अशी टिप्पणी त्यांनी केली.
एक आठवड्यात 9 हत्या
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने या प्रदेशात गेल्या एका आठवड्यात परप्रांतीयांचे 9 बळी घेतले आहेत. यांमध्ये एका स्थानिक डॉक्टरचाही समावेश आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक झाल्यापासून दहशतवादी हिंसाचारात वाढ झाली आहे. नव्याने निवडून आलेले प्रदेश सरकार अस्थिर करण्याचा पाकिस्तानचा डाव असून या सरकारने सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. निवडणुकीनंतर अब्दुल्ला यांच्या पक्षाचे सरकार या प्रदेशात स्थानापन्न झाले. आता पुन्हा दहशतवादाने डोके वर काढल्याने प्रदेश सरकारची कोंडी झाली आहे.
केंद्राचे सहकार्य हवे
जम्मू-काश्मीरची प्रगती होण्यासाठी केंद्र सरकारने साहाय्य करण्याची आवश्यकता आहे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये प्रदेशाचा विकास करण्याचा प्रयत्न कोणत्याही सरकारने केलेला नाही. आमचे सरकार चहुमुखी विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. रोजगार निर्मिती, शांतता आणि सद्भावना निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यात केंद्राने सहयोग करावा असे आवाहन त्यांनी केले.