‘कृषी’तर्फे शेततळ्यांना मिळणार सबसिडी
अर्जाचे आवाहन : कुंपण, स्प्रिंक्लर, डिझेल इंजिनचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी कृषीभाग्य योजनेंतर्गत शेततळे निर्माण करण्यासाठी अनुदान उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या रयत संपर्क केंद्र किंवा कृषी खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेततळे निर्माण करण्यासाठी खड्डा खोदाई, तारेचे कुंपण, डिझेल इंजिन, ताडपत्री, स्प्रिंक्लर असे या योजनेंतर्गत साहित्य उपलब्ध होणार आहे. अनुसूचित जाती- जमातीतील शेतकऱ्यांना 90 टक्के तर सामान्य शेतकऱ्यांना 80 टक्के सबसिडी मिळणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसातही शेती पिकांना पाणी उपलब्ध व्हावे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी, यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 868 शेततळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी शेतकऱ्यांना अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे. जादा अर्ज दाखल झाल्यास लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची या योजनेसाठी निवड केली जाणार आहे.
शासकीय योजनेंतर्गत यापूर्वी शेत तलावाची निर्मिती केलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार नाही. शिवाय विहीर आणि कूपनलिका असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. शेतकऱ्यांना शेततळे निर्मितीसाठी उत्तम संधी असून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषी सहसंचालक शिवनगौडा पाटील यांनी केले आहे.