कालव्याला लागलेल्या गळतीमुळे शेती पाण्याखाली
कोणीवाड - कोलवाळ येथील घटना, दखल न घेतल्यास मोर्चा नेण्याचा ग्रामस्थांचा इशारा, हमरस्त्याच्या बांधकामावेळी माती टाकून ओहोळ बुजविला
म्हापसा : कोणीवाडा कोलवाळ येथील शेतातून गेलेल्या कालव्याला गळती लागली असून पाणी झिरपून शेतात साचत असल्याने शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच गेल्या पाच वर्षापूर्वी हमरस्ता बांधताना मोठ्या प्रमाणात टाकलेल्या मातीमुळे मुशीर कोलवाळ येथे असलेला ओहोळही बुजवला गेल्याने शेतातील पाणी बाहेर जाण्यासाठी वाटच नाही. त्यामुळे पाणी शेतातच साचून राहून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या विरोधात रविवारी श्री तळेश्वर मंदिराच्या आवारात शेतकरी, ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात जलसिंचन खात्याने ओहोळ पूर्ववत करुन पाण्यासाठी वाट करावी तसेच कालव्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली असून अन्यथा खात्यावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. सरपंच रितेश वारखंडकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने ग्रामस्थ बैठकीला उपस्थित होते. या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी काही सूचनाही केल्या. शेवटी एकमताने नव्याने सर्व संबंधित खात्यांशी तसेच आमदार, मंत्री, मुख्यमंत्र्यांना सर्वांच्या सहीनिशी पत्रव्यवहार करण्याचे ठरविण्यात आले. सरकारने आमच्या समस्यांकडे त्वरित लक्ष देऊन त्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली.
सरकारने त्वरित दखल घ्यावी : रितेश वारखंडकर
![]()
सरकार योजनांचा फायदा घेऊन शेती करण्याचे आवाहन करते मात्र त्यांच्याच जलसिंचन खात्याच्या कालव्याला लागलेल्या गळतीमुळे शेतीची होणारी नुकसानी त्यांना दिसत नाही का? कालव्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती असून ती पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित खात्याकडे अनेकवेळा पत्रव्यवहार केला मात्र कुणीच लक्ष देत नाही. त्यामुळेच शेतकरी व ग्रामस्थांनी ही बैठक आयोजित केली होती. येथे श्री तळेश्वर देवस्थान आहे ते पावसात बुडते. त्यावेळी पुजाही करता येत नाही. सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांची समस्या सोडवावी अन्यथा सर्व ग्रामस्थांना घेऊन एकत्रितपणे मोर्चा काढण्याचा इशारा कोलवाळ सरपंच रितेश वारखंडकर यांनी दिला.
ओहोळ पूर्ववत करावा : प्रितेश मांद्रेकर
पूर्वी येथे मोठ्या प्रमाणात शेती व्हायची. आताही ग्रामस्थांना शेती करायची आहे पण हमरस्ता बांधताना मुशीर येथील ओहोळ बुजविल्यामुळे शेतातील पाणी बाहेर जात नाही. त्यातच कालव्याला गळती लागल्यामुळे पाणी शेतात साचत आहे. पूर्वी पावसाळ्यात भात शेती व उन्हाळ्dयात भाजीपाला लागवड केली जायची. आता कोणतेही पिक घेणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून सरकारने ओहोळ खोदून पाण्याला वाट करावी, अशी मागणी मागणी प्रितेश मांद्रेकर यांनी केली.
कालव्याची त्वरित दुरुस्ती करावी : चंद्रहास बांदेकर
गेली 40 वर्षे आपण येथे शेती करतो. हमरस्ता बांधण्यात आला. त्यावेळी मुशीर येथील ओहोळात महामार्गाची माती टाकल्याने ओहोळाची वाट बंद झाली. त्यामुळे डोंगराळ भाग, कुंभारवाडा, कोणीवाडा येथून ओहळाद्वारे येणारे पाणी अडून आमच्या शेतात भरुन राहते. पावसाळ्dयात तर शेताला तळ्dयाचे स्वरुप प्राप्त होते. हा पाण्याचा प्रश्न सुटायला हवा. तसेच कालव्यालाही गळती लागली आहे. त्याचे पाणी झिरपून शेतात साचत असल्याने खरीप हंगामातही शेती करता येत नाही. सरकारने लवकरात लवकर कालवा दुरुस्त करावा, अशी मागणी शेतकरी चंद्रहास बांदेकर यांनी केली.
पाण्यासाठी वाट करणे गरजेचे : दत्ता शिरोडकर
मुशीर - कोलवाळ येथून जाणारा मोठा ओहोळ हमरस्त्याच्या कामावेळी माती टाकून बुजविल्याने दरवर्षी पाणी शेतात तुंबून राहते. जोपर्यंत या पाण्याला जाण्यासाठी वाट करण्यात येत नाही तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. पूर्वी कसे होते आणि आता काय झाले आहे हे सर्वांना माहीत आहे. हा प्रश्न सुटला तरच येथे शेती करणे शक्य असल्याचे ग्रामस्थ दत्ता पंढरी शिरोडकर म्हणाले.
पावसात तळेश्वर मंदिरही जाते पाण्याखाली
या भागात असलेले श्री तळेश्वर देवस्थान ग्रामस्थ व कमिटीने उभे केले आहे. आमचा वाडा सखल भागात आहे. ओहोळाची वाट बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी आमच्या भागात येऊन साचते. पावसाळ्यात दरवर्षी आमचे देवस्थान 1 मीटर पाण्याखाली जाते. त्यामुळे देवस्थानात पुजा करताना त्रास होतो. सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी श्री तळेश्वर देवस्थान कमिटी अध्यक्ष अशोक कांबळी व खजिनदार प्रितेश हळर्णकर यांनी केली आहे.



