For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

शेतकरी आज दिल्लीला धडक देणार! केंद्र सरकारशी चर्चा अपयशी निर्णय

06:33 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेतकरी आज दिल्लीला धडक देणार  केंद्र सरकारशी चर्चा अपयशी निर्णय

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

किमान आधारभूत मूल्यासंबंधी केंद्र सरकारशी चर्चा अपयशी ठरल्याने आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आज दिल्लीला धडक देण्याचा निर्धार केला आहे. केंद्र सरकारने त्यांना आणखी चार पिके किमान आधारभूत मूल्याच्या सूचीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिला होता. तथापि, शेतकऱ्यांच्या नेत्यांनी तो फेटाळला आहे. पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार आता या संघटना दिल्लीकडे येत आहेत.

केंद्र सरकारने हेतुपुरस्सर आमच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात चालढकल चालविली आहे. सर्व पिकांना किमान आधारभूत मूल्य देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा, अशी आमची मागणी आहे. तथापि, केंद्र सरकारने वेगवेगळे प्रस्ताव ठेवून ही मागणी टाळली असल्याचा आरोप संघटनांनी केला.

Advertisement

उच्च न्यायालयाचा आदेश

Advertisement

आंदोलक शेतकऱ्यांनी महामार्गांवर ट्रक किंवा ट्रॅक्टर अशी अवजड वाहने आणू नयेत, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी महामार्ग अडवून धरले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्य नागरिकांना त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांना अवजड वाहने न आणण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. तिच्यावर मंगळवारी सुनावणी झाली.

दिल्लीत कडेकोट सुरक्षा

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. लाल किल्ला परिसर पूर्ण बंद करण्यात आला आहे. संसद, राष्ट्रपती भवन, सरकारी कार्यालये इत्यादी महत्त्वाच्या आस्थापनांसाठी वाढीव सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. नागरिकांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय राखीव दलांनाही सज्ज ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीबाहेरच अडविला जाण्याची शक्यता असून दिल्लीत प्रवेश करण्याच्या तिन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
×

.