बीडीसीसी बँकेकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार
आण्णासाहेब जोल्ले ; पीकेपीएस सदस्यांची बैठक
बेळगाव : बीडीसीसी बँकेकडून शेतकऱ्यांना हवी ती मदत मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष आण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले. येथील धर्मनाथ भवनात गुऊवारी दि बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे (बीडीसीसी) बेळगाव तालुक्यातील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ व इतर सहकारी संघ अध्यक्ष व सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जोल्ले बोलत होते. सहकार क्षेत्राचा विकास व्हावयाचा झाल्यास संघाचे सदस्य व संचालक मंडळ यांच्यात समन्वय असायला हवा. सर्वांनी एकजुटीने कार्य करीत बँकेच्या विकासाबरोबरच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करूया.
ग्रामीण भागातील सहकारी संघांनी शेतकरी व गरिबांना कर्ज सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या कल्याणासाठी कार्य केले पाहिजे. ‘मी सर्वांसाठी, सर्व माझ्यासाठी’ हे सहकार तत्त्व पालन झाले पाहिजे. बँकेमार्फत बैठका घेऊन कृषी क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने कार्य झाले पाहिजे. बँकेशी शेतकऱ्यांना सुलभपणे व्यवहार करणे अनुकूल होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एटीएमद्वारे शेतकऱ्यांना पैसे देणे, पैसे स्वीकारणे सुलभ होणार आहे असे ते म्हणाले. त्यानंतर आमदार भालचंद्र जारकीहोळी, संचालक राहुल जारकीहोळी यांनी विचार व्यक्त केले. बैठकीला संचालक चन्नराज हट्टीहोळी, बीडीसीसी बँकेचे मुख्य व्यवस्थापक एन. जी. कलावंत, उपव्यवस्थापक शिवकुमार बागेवाडी, मंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सचिव मलगौडा पाटील, लखनगौडा पाटील, शिवराम पाटील आदी उपस्थित होते.