ऊसाला प्रतिटन ५,००० रुपये दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करू देऊ नका! शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा इशारा
वडापूर (सोलापूर) : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाला पहिली उचल प्रतिटन ४,५०० रुपये आणि अंतिम दर प्रतिटन ५,००० रुपये जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस तोडू देऊ नये, असे आवाहन रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक भोसले यांनी केले. ऊसदराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून संघर्षाची तयारी ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऊसदर संघर्ष समिती, सोलापूर जिल्हा यांच्या वतीने वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे पहिल्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भोसले बोलत होते. व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, निवास नागणे, अतुल फाटे, कृष्णप्पा बिराजदार, सिद्धाराम काकणगी यांच्यासह शेतकरी नेते अरुण पाटील, गणपती पुजारी, सुभाष पाटील आणि नामदेव गायकवाड उपस्थित होते.
ऊसदरासाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
जिल्ह्यातील ऊसदर आंदोलनाची सुरुवात वडापूर येथून झाली असून, साखर कारखानदारांनी योग्य दर जाहीर केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असे दीपक भोसले यांनी सांगितले. शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून, त्याच्या कष्टाला योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, हीच संघटनेची अपेक्षा आहे. मात्र, कारखानदारांकडून योग्य दर मिळत नसल्याने टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी अडचणीत
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांनी शेतीच्या वाढत्या खर्चाचा मुद्दा उपस्थित केला. खते, बियाणे, ट्रॅक्टरद्वारे मशागत आणि मजुरीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र, शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. या परिस्थितीत काही शेतकऱ्यांवर टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येत असून, त्यांच्या कुटुंबांवरही गंभीर परिणाम होत आहेत, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी अन्यायाविरोधात संघटित होऊन संघर्ष करावा आणि योग्य दर मिळेपर्यंत आपल्या मागण्यांवर ठाम राहावे, असे आवाहन फाटे यांनी केले.
यावेळी शेतकरी नेते सिद्धाराम काकणगी आणि निवास नागणे यांनीही ऊसदराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवावेत आणि ऊसदरासाठी एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन नागणे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात अरुण पाटील यांनी मागील हंगामात साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांना मिळालेल्या दरासंदर्भातील अनुभव मांडले.
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना ६०० कोटींचा फायदा झाल्याचा दावा
मागील हंगामात जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सुरुवातीला उसाचा अंतिम दर प्रतिटन २,७०० रुपये जाहीर केला होता. मात्र, शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर हा दर प्रतिटन ३,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. या दरवाढीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण ६०० कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा दावा दीपक भोसले यांनी केला.
विविध गावांतील शेतकऱ्यांचा सहभाग
या मेळाव्याला वडापूरसह कुसूर, तेलगाव, भंडारकवठे, विंचूर, कंदलगाव, अंत्रोळी तसेच मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर, बोराळे, अरळी आणि मोहोळ तालुक्यातील मिरी, वटवटे व जामगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यादरम्यान शेतकरी नेते आणि उपस्थित शेतकऱ्यांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, ‘उसाला प्रतिटन ५,००० रुपये दर मिळालाच पाहिजे’, ‘कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय’, ‘ऊस आमच्या घामाचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘जय जवान, जय किसान’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी मेळाव्याचे वातावरण उत्साहपूर्ण झाले.
ऊसदराच्या मागणीसाठी वडापूर येथे झालेल्या या मेळाव्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ऊसदर आंदोलनाला वेग येण्याची शक्यता असून, कारखानदार यावर काय भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
