बिनविरोधचे प्रयत्न अयशस्वी; सर्वपक्षीय आघाडीविरोधात बाबा नेसरीकर आघाडीचे 7 उमेदवार रिंगणात
ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती उमेदवारांची बिनविरोध निवड
कोल्हापूर प्रतिनिधी
शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. ओबीसी आणि भटक्या जाती-जमाती गटाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र व्यक्ती सभासद गट, संस्था आणि महिला गटासाठी निवडणूक लागणार आहे. नेसरीकर यांना डावलल्याच्या नाराजीतून विरोधी पॅनेल तयार झाले आहे. बाबा नेसरीकर यांचे नातू यशोधन नेसरीकर यांनी 7 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
एकेकाळी आशिया खंडात नावाजलेल्या आणि सध्या आर्थिक अडचणीत असणाऱ्या शेतकरी सहकारी संघाची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी 279 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आज अखेरच्या दिवसापर्यंत 249 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे 30 उमेदवार रिंगणात उरले. त्यापैकी ओबीसी गटातून सुनील मोदी आणि भटक्या जाती-जमाती गटातून राजसिंह शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले. मंगळवारी सर्वपक्षीय पॅनेल जाहीर करण्यात आले. आणि निवडणूक बिनविरोध करण्याचे त्यांनी आवाहन केले होते. मात्र नेसरीकरांना डावलल्याने नाराजी वाढली. बाबा नेसरीकर यांचे नातू यशोधन शिंदे-नेसरीकर यांनी बुधवारी 7 उमेदवारांचे विरोधी पॅनेल जाहीर केले आहे. यशोधन नेसरीकर, मुकुंद पाटील, आकाराम पाटील, सुमित पाटील, सुभाष देसाई, जान्हवी रावराणे आणि सुधा इंदुलकर असे नेसरीकर पॅनेलचे सात उमेदवार आहेत. मोहिते-नेसरीकर पॅनेल करण्याचे ठरले होते. पण ऐनवेळी अजितसिंह मोहिते यांनी दगाफटका केल्याचा आरोप यशोधन नेसरीकर यांनी केला आहे. त्यामुळे विरोधी पॅनेल करण्याची वेळ आली असल्याचे नेसरीकर यांनी स्पष्ट केले. शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध झाल्याची मंगळवारपासून जोरदार चर्चा होती. मात्र बाबा नेसरीकर यांच्या नातवाने पॅनेल रिंगणात उतरवल्यामुळे निवडणुकीची रंगत वाढणार आहे.a