रस्त्यासाठी हालगीमर्डी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : तालुक्यातील हालगीमर्डी येथे नूतन राणी चन्नम्मा विद्यापीठ निर्माण करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या बाजूने कंपाऊंड बांधण्यात येत आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी असणारा रस्ता बंद झाला आहे. यामुळे त्यांच्यावर समस्यांचा डोंगर कोसळला आहे. यासाठी विद्यापीठाशेजारून किवा पर्यायी मार्ग देण्याची मागणी शेतकरी व रहिवाशांतून करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. कंपाऊंड बांधताना सर्व्हे क्र. 47, 48, 49, 64 व 65 शेताकडे जाण्यासाठी असणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे शेती पिकविणे कठीण बनले असून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तसेच जनावरांना चरण्यासाठी असणारा मार्गही बंद झाला आहे. यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्नही आवासून पुढे आला आहे. या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन रस्ता देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.