भाजी मार्केट एपीएमसीत स्थलांतरासाठी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा
संकेश्वर भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबवा
बेळगाव : संकेश्वर येथील दुरदुंडेश्वर भाजीपाला मार्केटचे एपीएमसीमध्ये स्थलांतर करण्यात यावे, या मुख्य मागणीसह पुरामुळे पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, संपूर्ण कर्ज माफ करावे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, ग्रामीण भागात 24 तास वीजपुरवठा, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटना व हसिरू सेनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून आंदोलन केले. तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. संकेश्वर शहराजवळ भाजी मार्केट असून सदर मार्केट श्री दुरदुंडेश्वर मठाच्या खासगी जागेमध्ये आहे. हे मार्केट गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र सध्या भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत जागा अपुरी पडत आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. व्यापार करण्यास अडचणीचे जात आहे. बाजारपेठेत भाजीपाला विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रत्येक पिशवीला 10 रुपये शुल्क आकारले जात आहे.
व्यापाऱ्यांकडून 2 रुपये शुल्क आकारले जात आहे. बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असून यावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे व्यापारी आपल्या मर्जीप्रमाणे भाव ठरवून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. व्यापाऱ्यांच्या मस्तवालपणामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यासाठी शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, जवळच असणाऱ्या एपीएमसी मार्केटमध्ये या भाजी मार्केटचे स्थलांतर करण्यात यावे, त्यामुळे संकेश्वर शहरासह हुक्केरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोय होणार आहे. मठाच्या जागेतील भाजी मार्केट बंद करून हक्काच्या एपीएमसीमध्ये भाजी मार्केट सुरू करण्यात यावे. जिल्हा प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, मस्तवाल व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीतून शेतकऱ्यांची सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी चन्नम्मा चौकात आंदोलन करून मोर्चा नेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले.