हलगा सांडपाणी प्रकल्पाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद
प्रकल्पाला तीव्र विरोध : वॉटर सप्लायच्या अभियंत्यांना धरले धारेवर
बेळगाव : हलगा येथील वादग्रस्त सांडपाणी प्रकल्पाचे काम शेतकऱ्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा बंद पाडले. शेतकरी नेते प्रकाश नायक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपला विरोध व्यक्त केला. कर्नाटक अर्बन वॉटर सप्लायच्या अभियंत्या अश्विनी कलकुटकर या मंगळवारी सांडपाणी प्रकल्पावर आल्या असता शेतकरी नेते प्रकाश नायक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी प्रकल्पाला विरोध करत त्यांना धारेवर धरले. सदर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे असे ठणकावून सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या जीवावर उठून हे काम केले जात आहे, असा आरोप करण्यात आला. यावेळी शेतकरी आण्णाप्पा हुडेद, भरत बेल्लद, तवनाप्पा देसाई, महावीर इंचल, नागेंद्र देवलतकर, श्रीनिवास कंगळगौडा, सुकुमार हुडेद, अर्जुन बेल्लद, प्रकाश बाळेपुंद्री आदी शेतकरी उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिरेबागेवाडी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.