शेतकऱ्यांनी सातबारावर फळपीक लागवडची नोंदणी करावी
माजी आमदार शिवराम दळवींचे आवाहन
सावंतवाडी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा हा आंबा ,काजू ,फणस ,कोकम ,नारळ ,सुपारी अशा फळ बागायतींचा जिल्हा आहे. पण आज लहरी हवामान व अवकाळी पाऊस यामुळे हे कोकणचे फळपीक पूर्णपणे धोक्यात आले आहे. सध्या आंब्याचे दर वाशी मार्केटमध्ये कमालीचे वाढले आहेत. सध्या आंबा पीक शेतकऱ्यांच्या बागायतीमध्येच घटत आहे. अशा स्थितीत कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळ बागायतदार पूर्णपणे आर्थिक विवंचनेत आहेत . या शेतकरी बागायतदार राजाला शासनाकडून काजू ,आंबा ,फळ पिकसाठी अनुदान आहे खरं ,पण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बागायतदार याने आपल्या सातबारावर फळपीक लागवडची नोंद करणे आवश्यक आहे. आता भविष्यात लहरी हवामानामुळे शेती बागायती धोक्यात असून त्यात वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान पाहता अशा स्थितीत जर तुमच्या सातबारा नोंदीवर आंबा ,काजू ,कोकम फणस लागवड असेल तर तुम्ही तारणहार ठरणार आहात नाहीतर येत्या काळात कोकणची ही फळ बागायत आणि शेतकरी वर्ग पूर्णपणे देशोधडीला लागणार आहे . त्यामुळे आतापासूनच कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी राजाने आपल्या गावातील तलाठी कार्यालयात जाऊन आपल्या जमिनीच्या सातबारावर आपल्या असलेल्या फळ लागवडीची नोंद करून घ्यावी अशी कळकळीची विनंती उद्योजक तथा माजी आमदार शिवराम दळवी यांनी केली आहे.
सध्या कोकणातील आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनी पूर्णपणे परप्रांतीयांच्या घातल्या जात आहेत . त्या जमिनीवर परप्रांतीय आता फळबागायती करत आहेत आणि हे परप्रांतीय आपल्या फळबागायतींची नोंद सातबारावर करत आहेत. त्यामुळे शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई ही आपल्या गोरगरीब शेतकऱ्याला मिळत नसून ती परप्रांतीय जमीन धारकांना मिळत आहे. कारण ते सजग आहेत. ते आपल्या जमिनीवर असलेल्या फळ लागवडीची नोंद सातबारावर करत आहेत. मात्र आपला कोकणातील काबाडकष्ट करणारा गोरगरीब शेतकरी फक्त आपल्या शेती बागायतीत राबत आहे. पारंपारिक नारळ फोपळी ,काजू ,आंबा ,कोकम हे फळपीक आपल्या शेतात जमिनीत आहे. पण त्याची नोंद सातबारावर अनेक शेतकऱ्यांची नाही असे सरकारी दरबारी दिसत आहे. त्यामुळे शासनाकडून सध्या काजू अनुदान कोट्यावधी रुपये मंजूर झाले. पण अनेक शेतकऱ्यांच्या काजूची नोंद त्यांच्या सातबारावर नसल्याने अनेक शेतकरी काजू पीक घेत असतानाही ते शासनाच्या अनुदानापासून दूर गेले आहेत. तसेच अतिवृष्टीमुळे देखील आतापर्यंत गेली कित्येक वर्ष आंबा पीक ,काजू ,कोकम ,नारळ ,सुपारी ,पूर्णपणे कोलमडून गेली आहे. आपल्या कोकणात फळ लागवड मोठ्या प्रमाणात होते. परंतु , त्याची भरपाई शासन स्तरावर योग्य प्रमाणात मिळत नाही. मात्र उलटपक्षी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या भागात प्रत्येक सातबारावर येतील फळ पिकाची नोंद होत आहे आणि त्यामुळे वातावरणात बिघाड झाल्यावर त्यांना भरपाई मिळते आणि आपल्याला मात्र म्हणावी तशी भरपाई शासन स्तरावरून मिळत नाही .त्यामुळे शेतकऱ्यांनी सातबारावर नोंद करावी असे आवाहन माजी आमदार शिवराम दळवी यांनी केले आहे .